पुढील राष्ट्रपती काँग्रेसचाच होण्याचे स्पष्ट संकेत-

नवी दिल्ली दि.३- लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराला राष्ट्रपतीपदासाठी पाठींबा नाही ही एकतर्फी भूमिका त्याच्या सहयोग पक्षांना नाराज करून गेली असल्याने आता काँग्रेसचाच उमेदवार राष्ट्रपतीपदी विराजमान होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विद्यमान राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्याजागी आता काँग्रेसमधील अर्थमंत्री प्रणव मुखर्जी येणार की उप राष्ट्रपती अन्सारी इतकाच प्रश्न उरला आहे.
   भाजपने आपली भूमिका अन्य पक्षांशी विचारविनियम न करताच जाहीर केल्याने सहपक्ष दुखावले गेले आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लवकरच सर्व सहयोगी पक्षांची बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून थोडी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपच्या हातातून आता बाण सुटला असल्याची चर्चा सुरू आहे.अन्य पक्षांची साथ मिळणे दुरापास्त झाल्याने भाजप काँग्रेस विरोधात आपला उमेदवार निवडून आणू शकणार नाही अशीही चर्चा सुरू आहे.
   जनता दल युनायटेडचे शरद यादव यांनी तर सुषमा स्वराज यांनी जाहीर केलेल्या पक्षभूमिकेबद्दल उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे तर जेडीयूचे पॉवरहाऊस बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर भाजप त्यांच्याच भूमिकेवर ठाम राहिल्यास अन्सारींना पाठींबा देण्यात येईल असे सांगितले आहे. समाजवादी पक्षानेही भाजपला कोणतेही आश्वासन दिलेले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनीच आपल्या पक्षाला पाठिबा मिळविण्यात बाजी मारली असल्याचेही दिसून येत आहे.
   सोनियांनी डीएमकेला समजावले आहे तर ममतांच्या तृणमूलने आपले पत्ते अजून ओपन केले नसले तरी त्या विरोधात जाण्याची शक्यता कमी आहे. नितीशकुमार यांनी तर अन्सारींच्या नांवाला यापूर्वीच पाठींबा दिला आहे. डाव्या पक्षांनीही यापूर्वीच मुखर्जी किंवा अन्सारी यांना पसंती दर्शविली आहे.
  प्रश्न इतकाच आहे की आता नक्की वर्णी कुणाची लागणार? अर्थमंत्री प्रणव मुखर्जी की उप राष्ट्रपती अन्सारी ? प्रणव मुखर्जींनी यापूर्वीच ते २०१४ ची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे मात्र त्यांच्या चतुर राजकारणाची आणि हुषारीची गरज काँग्रेसला भासते आहे. या उलट अन्सारी अल्पसंख्याक आहेत आणि सक्रीय राजकारणात नाहीत त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचेही सांगितले जात आहे.

1 thought on “पुढील राष्ट्रपती काँग्रेसचाच होण्याचे स्पष्ट संकेत-”

  1. pudhacha rashtrapati rajmarnatala nako….pratibha patil marathi asun dekhil tyancha kahich upyog zala nahi…tya fakta vait news mulech charchet rahilya

Leave a Comment