चार प्रमुख टेलिकॉम कंपन्यांचे प्रमुख चर्चेसाठी दिल्लीत- मंत्री सिब्बल यांची भेट घेणार

 नवी दिल्ली दि.२- टेलिकॉम अॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने स्पेक्ट्रम वाटपासाठी नव्याने सुचविलेले दर आणि ट्रायची धोरणे यासंबंधी चर्चा करण्यासाठी चार प्रमुख टेलिकॉम कंपन्यांचे प्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत.
   भारती एअरटेलचे सुनिल मित्तल, व्होडाफोनचे व्हिटोरिओ कोला, टेलिनॉरचे फ्रेडरिक बाकसस आणि आयडिया सेल्युलरचे कुमारमंगलम बिर्ला यांनी आज टेलिकम्युनिकेशन विभागाचे सचिव आर. चंद्रशेखर यांची भेट घेतली असून आज सकाळी त्यांनी गृहमंत्री पी चिदंबरम यांचीही भेट घेतली असल्याचे समजते. त्यानंतर ते अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि टेलिकम्युनिकेशन मंत्री कपिल सिब्बल यांचीही भेट घेणार आहेत असे सांगण्यात येत आहे.
  ट्रायने स्पेक्ट्रम विक्री बाबत घातलेल्या निर्बंधामुळे सर्वच टेलिकॉम कंपन्या अडचणीत आल्या असून त्यांना त्यांचे दर वाढविणे भाग पडते आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. व्होडाफोनचे कोला यांनी मंगळवारी सायंकाळी प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली असल्याचेही वृत्त आहे. टेलीनॉर या नॉर्वेजियन फर्मचा भारतीय उपशाखा युनिनॉरमध्ये मोठा हिस्सा आहे. त्यांनी आपल्या सर्व मालमत्तेसंबंधी लेखी माहिती देण्याची तयारी दाखविली आहे मात्र ट्राय ने सुचविलेल्या नव्या किंमती स्वीकाराव्या लागल्या तर भारतातून बाहेर पडणेच आम्ही पसंत करू असे फ्रेडरिक बाक्सस यांनी सांगितले आहे.
  एनडीटिव्हीला कर सवलत मिळाली आहे त्याबाबत अर्थसचिव आर.एस गुजराल यांनी भारतीय उद्योग क्षेत्रावर व त्यातही कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीवर तोंडसुख घेतले असून त्यांनी व्होडाफोनची वकीली करताना थोडा विचार करायला हवा असे सुनावले आहे.

Leave a Comment