अल कायदाचे नांव बदलण्याचा ओसामाचा होता विचार

वॉशिंग्टन दि.२- पाकिस्तानातील अबोटाबाद येथे गतवर्षी याच दिवशी म्हणजे दोन मे रोजी अमेरिकेच्या सील कमांडोनी क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनचा खातमा करून अल कायदा संघटनेचा पायाच खिळखिळा केला त्या घटनेला आज एकवर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने अल कायदाची जी महत्त्वाची कागदपत्रे अमेरिकेच्या हाती लागली आहेत, त्यातून ओसामा अस्वस्थ होता हे दिसून येत असल्याचे होमलँड सिक्युरिटी विभागाचे जॉन ब्रेनॉन यांचे म्हणणे आहे. जॉन ब्रेनॉन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे सहाय्यक आहेत.
    अमेरिकेने सतत चालविलेले द्रोन हल्ले आणि ओसामाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अविरत चालविलेले प्रयत्न यामुळे ओसामाला त्याच्या मनाप्रमाणे काम करणे अशक्य बनले होते हे या कागदपत्रांवरून दिसून येत असल्याचे सांगून ते म्हणाले की अल कायदा या नावाची मुस्लीम लोकांनाही इतकी चीड निर्माण झाली होती की हे नांवच बदलावे असा विचार ओसामा करत होता. ओसामाने वॉर ऑफ टेरर या अमेरिकन वाकप्रचाराचा अर्थ अल कायदाला संपविणे असाच घेतला होता. या संघटनेकडून होत असलेल्या मुस्लीमांच्या हत्यांमुळेही मुस्लीम लोकांत त्यांच्याबद्दल नाराजी होती आणि त्यामुळेही अल कायदाची प्रतिमा इतकी खराब झाली होती की त्यामुळे ओसामा शेवटच्या दिवसांत अतिशय काळजीग्रस्त आणि चिंतातूर बनला होता. कोंडवाड्यात कोंडलेल्या गुरांप्रमाणे अल कायदाची परिस्थिती झाली आहे असे त्याचे मत बनले होते.
अरेबिक भाषेत अल कायदाचा खरा अर्थ आहे, द बेस किवा लढवय्यांचे ठाणे. अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढणार्‍या लढवय्यांची जी ठाणी ती अल कायदा. बिन लादेन कडील कागदपत्रांतूनच ही माहिती उघड झाल्याचे ब्रेनॉन यांचे म्हणणे आहे. अमेरिकेत जन्मलेला आणि लादेनचा पब्लीक रिलेशन प्रमुख गॅडन अॅडम यानेही अल कायदा लोकांकडून पैसा उकळणे, मशिदी उडविणे आणि लोकांना ठार मारणे असल्या कृत्यांमुळे बदनाम झाली होती असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या कृत्यांमुळेच जगात कोणाचाच त्यांच्यावर विश्वास राहिलेला नव्हता. परिणामी ओसामाचाही कुणावर विश्वास राहिला नव्हता. त्यातून त्यांचे प्रमुख नेते ठार झाल्यामुळे आणि तरूण उदयोन्मुख दहशतवादी दररोजच तयार होऊ लागल्यानेही ओसामा अडचणीत सापडला होता असेही या कागदपत्रांतून उल्लेखले गेले आहे.

Leave a Comment