सचिनच्या हस्ते क्रिकेट म्युझियमचे उदघाटन

पुणे दि.३०-क्रिकेटची पंढरी म्हणून जगात नांव असलेल्या लंडनमधील लॉर्डसवर असलेल्या क्रिकेट म्युझियमपासून प्रेरणा घेऊन पुण्याचे व्यावसायिक रोहन पाटे यांनी देशातले पहिलेवहिले क्रिकेट संग्रहालय उभारले असून येत्या दोन मे रोजी मास्टरब्लास्टर सचिनच्याच हस्ते त्याचे उदघाटन केले जात आहे. सहकारनगर मधील स्वानंद सोसायटीत हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.
  ब्लेडस ऑफ ग्लोरी असे नामकरण करण्यात आलेल्या या संग्रहालयात आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सचिनने घातलेला टी शर्ट, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंच्या सह्या असलेली बॅट, ब्रॅडमनची सही असलेली बॅट याच्याबरोबरच क्रिकेट विश्वातील अद्भूतरम्य गोष्टींचा खजिनाही क्रिकेट रसिकांना पहावयास मिळणार आहे.
  रिकी पाँटिग, सचिन, राहुल द्रविड, ख्रिस गेल या बॅटसमनच्या स्वाक्षर्‍या असलेल्या टोप्या, टीशर्ट, ट्रकपँट या संग्रहालयात आहेत तसेच सचिन विषयी स्वतंत्र दालनच येथे पाहावयास मिळणार आहे. त्यात सचिनच्या शंभर शतकांबद्दल माहिती देणार्‍या १०० छोट्या बॅटस आहेत. कुंबळे, मलिगा, वॉर्न, युनूस, मुश्ताक अहमद, मदनलाल, बिशनसिंग बेदी, मुरली यांच्या आठवणींना उजाळा देणार्‍या वस्तूही येथे ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाला भेट देण्यासाठी www.bladesofglory.net या वेबसाईटवर अगोदर वेळ ठरवून घ्यावी लागणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हे संग्रहालय पाहता येणार आहे. त्यासाठी तीन ते १५ वयोगटाला २५ रूपये तर त्यापुढील वयोगटाला ५० रू. तिकीट भरावे लागेल. प्रेक्षकांसाठी हे संग्रहालय ७ मेपासून खुले करण्यात येणार आहे.

Leave a Comment