
नवी दिल्ली, दि. २७ – कथित लष्करोपयोगी शस्त्र व्यवहारासाठी लाच स्वीकारताना कॅमेराबंद झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चार वर्षे कारावास आणि एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. लक्ष्मण यांची रवानगी आता तुरूंगात होणार असून, त्यांनी या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.
२००१ साली तहेलका या शोधवृत्त प्रकाशित करणार्या संकेतस्थळाने बंगारू लक्ष्मण यांचे स्टींग ऑपरेशन केले. त्यात ब्रिटनमधील एका कथित शस्त्रोत्पादन कंपनीचे मध्यस्थ म्हणून, तहेलकाच्या काही पत्रकारांनी लक्ष्मण यांची भेट घेतली. हा व्यवहार वाजपेयी सरकारकडून संमत करून घेण्यासाठी लक्ष्मण यांनी सदर पत्रकारांकडून लाच घेतल्याचे तहेलकाच्या स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झाल्यामुळे त्यांना पक्षाने पदावरून बडतर्फ केले. तसेच तत्कालीन केंद्र सरकारने याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा निर्णय घेतला.
विशेष सीबीआय न्यायालयासमोर झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीत लक्ष्मण व सीबीआय यांच्या वकिलांनी आपापल्या आशिलांची बाजू मांडली होती. यात न्यायालयाने शुक्रवारी लक्ष्मण दोषी असल्याचा निकाल दिला. शनिवारी सीबीआयच्या वकिलांनी लक्ष्मण यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली, तर लक्ष्मण यांच्या वकिलाने आपल्या आशिलाचे वय व प्रकृती अस्वास्थ्य लक्षात घेऊन न्यायालयाने लक्ष्मण यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. यावर न्यायालयाने लक्ष्मण यांना चार वर्षांचा तुरूंगवास व एक लाख रूपयांचा दंड सुनावला.