पारंपारिक विधींसह उघडले बद्रिनाथचे द्वार

बद्रिनाथ, दि. २९ – हिंदू धर्मियांची अतिशय पवित्र तीर्थक्षेत्रे असलेल्या चार धामांपैकी एक बद्रिनाथ धाम रविवारी सकाळी पारंपारिक धार्मिक विधींपूर्वक दर्शनासाठी खुले केले. यावेळी संपूर्ण बद्रिनाथ गाव वैष्णव भक्तांच्या गजराने दुमदुमले. हजारो भाविकांनी बद्रिनाथाचे दर्शन आणि पूजेचा लाभ घेतला.
    पौराणिक कथेनुसार स्वर्गस्थ गंगा नदी पृथ्वीवर येताना तिचे बारा प्रवाह झाले. त्यातील बद्रीनाथ येथील प्रवाह अलकनंदा या नावाने सुपरिचित आहे. या तीर्थक्षेत्री प्रत्यक्ष भगवान विष्णूने वास केला असल्याची श्रद्धा आहे. श्रेष्ठ तपस्वी नर व नारायण ऋषींची पूजादेखील या मंदिरात केली जाते. तसेच येथे वर्षभर अखंड नंदादीप तेवत असतो. हा दीप शाश्‍वत ज्ञानाचे प्रतीक समजला जातो. बद्रिनाथ हे स्वर्गद्वार समजले जाते. आद्य शंकराचार्यांनी इ.स.आठव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे बोलले जाते. या मंदिरात बद्रिनाथांसमवेत धनदेवता कुबेर, कृष्णभक्त उद्धव आणि प्रत्यक्ष उत्सवमूर्ती आहे. ही उत्सवमूर्ती देवांच्या निद्राकाळातील सहा महिने जोशीमठ येथील नरसिंह मंदिरात आणली जाते. तिथेच तिची प्रतिष्ठापना करून रोज पूजाअर्चा केली जाते.
    वर्षातील केवळ सहा महिनेच भाविकांना दर्शनासाठी खुले असणार्‍या या मंदिरात या काळात लाखो वैष्णव भक्त मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र येथे आल्यानंतर प्रचंड मोठ्या रांगा लावून घ्यावे लागणारे दर्शन टाळण्यासाठी या वर्षीपासून देवस्थानाने टोकन पद्धत अंमलात आणली आहे. या टोकनवर देवदर्शनाची वेळ लिहिलेली असेल. त्याच वेळी येऊन भाविकांना बद्रीनाथाचे दर्शन घेता येईल.

Leave a Comment