टायटॅनिक दोन- २०१६ सालात समुद्रप्रवासास निघणार

सिडनी दि.३०- ऑस्ट्रेलियातील अब्जाधीश क्लाईव्ह पामर यांनी टायटानिक या ऐतिहासिक जहाजाची प्रतिकृती बनविण्याची ऑर्डर चिनी जहाजबांधणी कंपनीला दिली असून हे जहाज २०१६ साली आपला पहिला प्रवास करेल असे सोमवारी जाहीर केले आहे.
  पामर म्हणतात, टायटानिक दोन हे जहाज म्हणजे मूळ टायटानिकची अत्याधुनिक प्रतिमाच असेल. टायटानिक दोन हे आपला पहिला प्रवास मूळ टायटानिक प्रमाणेच इंग्लंड ते न्यूयॉर्क असाच करेल. २०१६ सालात ते या प्रवासासाठी सिद्ध होईल.
  टायटानिक हे जहाज बुडाल्याच्या घटनेला नुकतीच १०० वर्षे उलटली असताना पामर यांनी ही घोषणा केली आहे. ते सांगतात, हे जहाज बांधण्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील तज्ञ चिनी कंपनी सीएससी जिंगलिंग शिपयार्ड बरोबर नुकताच करार केला आहे. मूळ टायटानिक प्रमाणेच हेही जहाज आलिशान, आरामदायक आणि आकर्षक असेलच पण त्यात फरक इतकाच असेल की या जहाजासाठी २१ व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक नेव्हीगेशन व सुरक्षा व्यवस्था असेल. मूळ टायटानिकवर काम केलेल्या शूर पुरूष व महिलांना मानवंदना म्हणून टायटानिक दोनची निर्मिती करण्यात येत आहे.
  उत्तर अटलांटिक समुद्रात हिमनगाला धडकल्यानंतर टायटानिक फुटले आणि जहाजावरील १५०० जणांना जलसमाधी मिळाली होती. १९१२ च्या काळातले हे जहाज म्हणजे समुद्रावरचे त्याकाळातले सर्वात मोठे, आलिशान आणि ऐषोआराम पुरविणारे जहाज होते. पहिल्याच प्रवासात ते समुद्राच्या तळाशी गेले होते.
   पामर यांनी ऑस्ट्रेलियन गोल्ड कोस्ट या पर्यटन पट्ट्यात रिअल इस्टेट व्यवसायात मोठी माया जमविली असून सध्या ते कोळसा खाण व्यवसायात आहेत. गतवर्षीच त्यांना ऑस्ट्रेलियातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्तीम्हणून मान मिळाला असून त्यांची संपत्ती ५ बिलीयन ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी आहे.
  ब्लू स्टार लाईन प्रायव्हेट लिमि. या नावाची शिपिंग कंपनी त्यांनी सुरू केली आहे. त्यात चार अलिशान जहाजे किवा लक्झरी क्रूझ बांधण्यात येणार असून टायटानिक दोन हे त्यातले पहिले जहाज आहे. ही सर्व जहाजे बांधण्याचे कंत्राट वरील चिनी कंपनीलाच देण्यात आले आहे. टायटानिक दोनच्या बांधणीसाठी किती खर्च येणार याविषयी मात्र पामर यांनी मौन बाळगले आहे.

Leave a Comment