जागतिक बँकेची सूत्रे एका डॉक्टरकडे !

ज्या विषयाचं, ज्या क्षेत्राचं आपण शिक्षण घेतो, त्याच क्षेत्रात पुढे आपण काम करावं, अशी अपेक्षा असते. पूर्वी तसं घडायचं. पण आता नोकरी-व्यवसायाच्या संधी वाढल्याने तसं घडतंच असं नाही ते घडण योग्य का अयोग्य हा स्वतंत्र प्रश्न आहे. पण जेव्हा मेडिकल-इंजिनिअरिंगसारख्या व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातही तसं घडायला लागतं तेव्हा स्वाभाविकच तो चर्चेचा आणि चितेचा प्रश्न बनतो. इंजिनिअर अथवा डॉक्टर होऊन त्या त्या क्षेत्रात कार्यरत राहण्याऐवजी हे तरुण आय.ए.एस./आय.पी.एस. होऊन कुशल प्रशासक म्हणून करताना दिसतात. वरचेवर हा ट्रेंड प्रवाह वाढत चालल्याचे अनुभवास येत आहे. महाराष्ट्रापुरतं बोलावयाचं झाल्यास डॉ. नितीन करीर, डॉ. संजय चहांदे अशी अनेक नावे शासकीय प्रशासनात उच्च व्यवस्थापनाच्या क्षेत्रातच नव्हे; तर कला, साहित्य व सामाजिक चळवळीतही असे अनेक डॉक्टर आघाडीवर असल्याचे दिसून येते. डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे इत्यादी कलावंत मंडळी रंगभूमी व चित्रपट अभिनव दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपल्या कामगिरीमुळे दिग्गज मृत्यूत ओळखले जातात. डॉ. अनिल अवचट हे साहित्याच्या क्षेत्रातील असेच एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहे. डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. भालचंद्र कानगो हे सामाजिक व कामगार चळवळीत कार्यरत आहेत. प्रश्न असा पडतो की या मंडळींना साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रातच कार्य करायचं होतं तर त्यांनी हा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा अट्टाहास कशासाठी केला? तसे करून त्यांनी अन्य एखाद्या वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात उतरून काम करू इच्छिणार्‍या युवक वा युवतीची जागा का अडवली? अशा प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने आपापल्या परीने शोधावीत. पण तसे घडले आहे हे खरे. बरे या वैद्यकीय वा अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक शिक्षणाचा त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात खरोखरच काही उपयोग झाला असेल का? हाही प्रश्नच आहे.
हे सारे आढळले ते जागतिक बँकेचे नव निर्वाचित अध्यक्ष डॉ. जिम याँग किम यांच्या निवडीमुळे जे आपल्याकडे घडत ते जगाच्या अन्य भागातही घडत असत. जागतिक बँकेसारख्या आर्थिक क्षेत्रातील बलाढ्य संख्येचा अध्यक्ष म्हणजे कोणीतरी अर्थशास्त्र अथवा बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ  व्यक्ती असणार असा आपला समज होतो. आत्तापर्यंत असेच घडत आले आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर १९४४ स्थापन झालेल्या जागतिक बँकेची तशीच परंपरा राहात आली आहे.
अगदीच अर्थतज्ज्ञ नसला तरी राजनैतिक क्षेत्रातील उत्साही व्यक्ती हे पद भुषवित आली आहे. पण डॉ. किम हे त्या सार्‍या परंपरेला छेद देणारे आहेत. डॉ. किम हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राशी निगडीत असून अर्थकारण किवा अर्थशास्त्राशी तसा त्यांचा अर्थाशी संबंध नाही. तसे ते बँकर किवा राजकारणीही नाहीत. मूळचे वैद्यकीय शास्त्राचे पदवीधर असलेले डॉ. किम हे मानववंश शास्त्राचेही अभ्यासक आहेत. जन्माने कोरियन परंतु अमेरिकेतच वास्तव्यास असलेलल्या डॉ. किम यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे काम केले आहे. एचआयव्ही एड्स निर्मूलन क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्याजागे आहे. हैती, लिसोथी, पेरू या देशांतील लोकांचा जीवनसंघर्ष त्यांनी जवळून पाहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तेथे आरोग्य सेवेचे जाळे उभारले आहे. विद्यापीठाएवढी व्याप्ती असणार्‍या डार्टमाऊथ कॉलेजचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचे एकूण कार्य पाहून न्यूजलीकने २००३ साली संभाव्य नेत्यांमध्ये (फेसेस टू वॉच) तर टाईम साप्ताहिकाने १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. केवळ ऐहिक व पायाभूत सोयी-सुविधांचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास नव्हे, तर मानवी जीवनाच्या शिक्षण आरोग्यविषयक अन्य सुविधांचा विकास तेवढाच महत्त्वाचा आहे. कदाचित तो दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवूनच आर्थिक विकासाला मानवी चेहरा ते देऊ शकतील म्हणून किम यांची निवड केली गेली असावी. ती निवड ते कितपत सार्थ ठरवितात हे पुढील पाच वर्षांत कळेल. शेवटी एखाद्या क्षेत्रात काम करावयाचे झाल्यास त्या विषयाचे तज्ज्ञच असले पाहिजेच असे नाही. त्याहीपेक्षा तुमच्या कामाची मुलभूत प्रेरणा, प्रश्न समजून घेण्याची क्षमता, उमदेपणा पारदर्शकता व झोकून देऊन परिश्रम घेण्याची तयारी हेच महत्त्वाचे असते. बाकी गोष्टी दुय्यम ठरतात हेच खरे.
– मनोहर कुलकर्णी

Leave a Comment