आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाणांसह १४ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई दि. ३० – बहुचर्चित आदर्श सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 राज्याचे महसूलमंत्री असताना आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा केल्याचे अंमलबजावणी संचालयाने न्यायालयात सांगितले. आदर्श सोसायटी घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. याप्रकरणी सीबीआयने आपला तपास पूर्ण केल्यावर चव्हाण यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे अंमलबजावणी संचालयाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले असून हा तपास १५ जून पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.
आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायिक आयोगाने आपल्या अहवालात आदर्श सोसायटीची जमीन कारगिलमध्ये शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांसाठी नव्हती, सरकारची होती  असे सांगितल्याने चव्हाण यांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र आता या नव्या घोषणेमुळे पुन्हा एकदा कारवाईची कुऱ्हाड चव्हाण यांच्यावर कोसळणार आहे.
या गुन्ह्यात चौदा जणांवर खटला दाखल करण्यात आला असुन नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.