अॅपलला मागे टाकत सॅमसंग स्मार्टफोन उत्पादनात पहिल्या क्रमांकावर

सोल-सॅमसंग इलेक्टॉनिक्सने अॅपलला मागे टाकत पहिल्या तिमाहीत जगातील सर्वात मोठे स्मार्टफोन व्हेंडॉर म्हणून आपले स्थान कायम केले असून या काळात कंपनीने तब्बल ४४.५ दशलक्ष स्मार्टफोन तयार केले आहेत. हे स्थान गाठतानाच कंपनीने बाजारातील आपला हिस्सा ३०.६ टक्क्यांवर नेला आहे. अॅपलने याच काळात ३५.१ दशलक्ष फोन्स तयार केले असून त्याचा बाजारातील हिस्सा २४.१ टक्के आहे. त्या खालोखाल नोकियाने तिसरे स्थान पटकावले आहे.
  दक्षिण कोरियातील सॅमसंगने ५.१५ बिलीयन डॉलर्सचा फायदा नोंदविला आहे. त्याचबरोबर त्यांचा गॅलेक्सी स्मार्ट फोन पुढच्याच आठवड्यात अपग्रेड करण्यात येत असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे कंपनीचे उत्पन्न अधिक वेगाने वाढेल असे सांगण्यात येत आहे. सॅमसंग आणि अॅपल या दोन कंपन्यांच्या हाय एंड स्मार्ट फोननी बाजारपेठेचा गतवर्षी ९० टक्के हिस्सा हासील केला होता व यावर्षीही त्यात बदल होण्याची शक्यता नाही असे सॅमसंगचे वरीष्ठ उपाध्यक्ष व इन्व्हेस्टर रिलेशन्सचे प्रमुख रॉबर्ट यी यांनी जाहीर केले आहे.
  रॉबर्ट यी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिसर्‍या जनरेशनच्या गॅलॅक्सी एसचे लंडनमध्ये पुढच्या आठवड्यात लाँचिंग केले जात असून उन्हाळी ऑलिपिक्स सुरू होण्याच्या अगोदर १०० दिवस हे लॉचिंग केले जात आहे. क्वॅड कोअर मायक्रोप्रोसेसरचा वापर या फोनमध्ये केला गेला आहे. गॅलेक्सी एस-थ्रीला आत्ताच मोठी मागणी असल्याने त्याची वेगळी जाहिरात करण्याची अथवा मार्केटिंग करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment