अमेरिकेनंतर मोदींवर ब्रिटनमध्येही बंदीची कुर्‍हाड

लंडन, दि. ३० – अमेरिकेनंतर आता ब्रिटन देखील गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ब्रिटनमध्ये येण्यावर बंदी आणू शकते. मोदी यांना व्हिसा देण्याच्या निर्णयात कोणताही बदल केला गेला नाही असे नुकतेच अमेरिकेने स्पष्ट केले होते. ब्रिटन सरकार आता परदेशी पाहुण्यांबाबत नवीन नियमावली तयार करीत आहे. या नियंमानुसार युरोपीय संघाचे सदस्य नसलेल्या देशातील मानवाधिकार नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांना ब्रिटनमध्ये येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. या नवीन कायद्याची घोषणा सोमवारी केली जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या २००३ मधील इंग्लंड दौर्‍याला तेथील लोकांनी तीव्र विरोध केला होता. यामुळेच २००५ मधील आपला इंग्लंड दौरा त्यांना रद्द करावा लागला होता. ‘द साऊथ एशिया सॉलिडेरिटी ग्रुप’ ने सांगितले आहे की, नव्या नियमांनुसार मोदी यांना इंग्लंडमध्ये प्रवेश दिला जावू नये. नरेंद्र मोदी गुजरात दंगलीतील आरोपी असल्यामुळे त्यांच्यावर बंदी लादण्यात आली आहे.
अद्याप याविषयी ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाने कोणतेही वक्तव्य केले नाही. परंतु, सरकार या नियमाला गंभीरतापूर्वक लागू करणार नसल्याचा आरोप एका मानवाधिकार कार्यकर्त्याने केला आहे. व्यक्ती-व्यक्ती नुसार सरकार वेगवेगळा पर्याय निवडू शकते परंतु आमचा याला विरोध असेलच असे या कार्यकर्त्याने सांगितले.
ब्रिटनच्या पहिल्या नियमांनुसार राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणार्‍या लोकांनाच व्हिसा नाकारला जात असे. पण नव्या नियमानुसार मानवाधिकार नियमांचे उल्लंघन करणार्‍या लोकांनाही व्हिसा नाकारण्यात येणार आहे. 

Leave a Comment