दुर्दैवी दिवस

    भारतीय जनता पार्टीच्या आणि देशाच्याही इतिहासामध्ये कालचा शनिवार एक दुर्दैवी शनिवार म्हणून नोंदला जाईल. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला या दिवशी पैसे खाल्ल्याबद्दल एक लाख रुपये दंड आणि चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली गेली आहे. हा निर्णय खालच्या न्यायालयाचा आहे, तो अंतीम नाही. अजून प्रतिवादीला उच्च न्यायालयाचे दरवाजे मोकळे आहेत. तिथे कदाचित त्यांची शिक्षा कमी होईल. परंतु खालच्या न्यायालयात का होईना भाजपाचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना शिक्षा सुनावली गेली आहे. ही गोष्ट मोठी दुर्दैवाची आहे. या घटनेने भारतीय जनता पार्टीचे नेते अडचणीत आले आहेत आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. परंतु सर्वसाधारण भारतीय माणसाला या गोष्टीने खेद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या घटनेने आपल्या देशातली राजकीय व्यवस्था आणि राजकीय पक्ष किती किडलेले आहेत तसेच आपले भवितव्य घडवणारी ही यंत्रणा किती पोखरलेली आहे हे लक्षात आलेले आहे. आपल्या देशाची सूत्रे अशा लोकांच्या हाती असतील तर देशाचे भवितव्य काय, असा प्रश्‍न कोणाच्याही मनामध्ये निर्माण होणार आहे.
    सध्या देशामध्ये बोफोर्सच्या भुताचा हैदोस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत येणार म्हणून भाजपा नेते आनंदात होते. त्यांनी कॉंग्रेसवर हल्ला करून कॉंग्रेस नेत्यांना हैराण करण्यासाठी शस्त्रे परजून बाह्या सरसावल्या असतानाच भाजपालाही जबर धक्का बसणारा हा निर्णय जाहीर झाला आहे. कॉंग्रेसचे नेते भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले असल्याचा प्रचार भाजपा नेत्यांनी सुरू केला असतानाच भाजपाचेही कमळ याच चिखलात रुतले असल्याचे दिसून आले आहे. बंगारू लक्ष्मण यांना लाच घेतल्याच्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. कॉंग्रेस पक्ष अनेक प्रकरणांत गुंतलेला असल्याने जनता त्यावर नाराज आहे. तेव्हा ही जनता येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला लाथाडणार आणि आपल्याला सत्ता प्राप्त होणार अशी स्वप्ने भाजपा नेते पहात होते. जनता कॉंग्रेसवर नाराज आहे हे खरे आहे पण त्यामुळे ही जनता भाजपला जवळ करणार असे काही दिसत नाही. कारण भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात काही फरक नाही याची जनतेला खात्री पटत चालली आहे.
    भाजपाच्या नेत्यांना या प्रकरणाची काहीच कल्पना नव्हती असे काही नाही. २००१ साली केन्द्रात भारतीय जनता पार्टी प्रणित रालो आघाडीचे सरकार होते. तेव्हा बंगारू लक्ष्मण हे भाजपाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एक लाखाची लाच घेतली होती. शस्त्राच्या व्यापार्‍याला संरक्षण मंत्रालयातून कंत्राट मिळवून देण्याच्या बोलीवर बंगारू लक्ष्मण यांनी त्याच्याकडून १ लाखाची लाच घेतली. या प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. बंगारू लक्ष्मण यांना पैसे घेताना कॅमेर्‍यात पकडले गेले. या प्रकाराची चित्रफीत टीव्हीवरून दाखवण्यात आली आणि सर्वांनी ती पाहिली. या प्रकरणात सीबीआयने खटला दाखल केला. पुरावा तर हाताशी होताच त्यामुळे लक्ष्मण यांना शिक्षा होणार याचीही अपेक्षा होती. या प्रकाराला १० वर्षे उलटून गेली आहेत. या खटल्याचा निकाल उशिरा येत आहे पण त्याला आता काही इलाज नाही. उशिरा असला तरी तो अपेक्षित आहे पण या निकालाने भाजपाचे नेते विचलित झाले असून, आता काय प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात पडले आहेत. म्हणूनच ते चुकीचे खुलासे करीत आहेत. त्यांनी काहीही खुलासा केला तरी तो फसवा ठरत आहे. लक्ष्मण यांचे हे प्रकरण वैयक्तिक आहे असा एक खुलासा भाजपाने केला आहे पण शेवटी माणूस पैसे खाताना वैयक्तिकच पैसे खात असतो.
    भाजपाच्या अध्यक्षांनी पैसे खाल्ले तर ते वैयक्तिक आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी खाल्ले, तर ते मात्र कॉंग्रेसचे असे काही म्हणता येणार नाही. वैयक्तिक आहे असे मानले तरीही पैसे खाताना ते भाजपाचे अध्यक्ष होते हे विसरता येत नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला की या पक्षाचे नेते सारवासारव फार करतात. त्यांनी पैसे खाल्ले तरीही पक्ष स्वच्छच आहे असा त्यांचा दावा असतो. हा न्याय ते कॉंग्रेसला मात्र लागू करायला तयार नसतात. भाजपा हा पक्ष स्वच्छ आहे असे मानले तरीही  या स्वच्छ पक्षाने या पैसेखाऊ अध्यक्षांना पक्षातून काढलेले नाही. पैसे खाल्ल्याचे उघड झाले तेव्हा अध्यक्षपदावरून काढले. पण लोकांना या प्रकाराचा विसर पडला. भाजपाने लक्ष्मण यांना अजूनही पक्षाच्या कार्यकारिणीत ठेवले आहे. याबाबत विचारणा केली असता, थातुर मातूर खुलासा करण्यात आला. लक्ष्मण हे माजी अध्यक्ष असल्याने त्यांना अजूनही कार्यकारिणीत ठेवले आहे असे स्पष्टीकरण करण्यात आले. हे स्पष्टीकरण लंगडे आहे. माजी अध्यक्ष कार्यकारिणीत असले पाहिजेत, असा संकेत आहे पण ते अध्यक्ष पैसे खाल्ल्यामुळे  अध्यक्षपदावरून पायउतार झाले असतील तरीही त्यांना माजी अध्यक्ष म्हणून मानाची वागणूक द्यावी का ? मग भाजपाचे साधन शुचित्व कोठे गेले ?