भारतीयांच्या शुभेच्छांच्या बळावर ऑलिम्पिक विजेतेपद मिळवू

पुणे, दि. २४ – सर्व भारतीयांच्या शुभेच्छा पाठिशी असल्याने आगामी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी करून, पदक जिंकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असा विश्‍वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार भरत छत्री याने व्यक्त केला.
    मंगळवारी कोरेगाव पार्क येथे एमक्यूअर फार्मासिटीकल्स् या कंपनीतर्फे लंडन ऑलंपिक २०१२ स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय हॉकी संघाचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उदय बोर्डे, भारताचे माजी क्रिकेट कर्णधार चंदू बोर्डे, हॉकी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेहता, डॉ. के. एच. संचेती आदी उपस्थित होते.
    भारतीय हॉकी संघ हा सध्या परिवर्तनाच्या चक्रातून जात आहे. संघामध्ये उदयोन्मुख आणि युवा खेळाडूंचा समान सहभाग असून, ते कोणत्याही जागतिक दर्जाच्या संघाशी दोन हात करण्यास सक्षम आहेत, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक मायकल नॉब्ज् यांनी केले. मेहता म्हणाले की, लंडन ऑलंपिक २०१२ स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय हॉकी संघात पदक जिंकण्याएवढी गुणवत्ता नक्कीच आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने गणेश वंदना व काही लावण्यांवर ठेका धरून उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Comment