धकधक गर्ल माधुरी महाराष्ट्र पर्यटन विभागाची अॅम्बॅसिडर बनणार?

अमेरिकेतून आपला नवरा आणि मुलांसह भारतात म्हणजे मुंबईत परतलेल्या माधुरीसाठी नवी असाईनमेंट मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभाग माधुरीला आपली ब्रँड अॅम्बॅसिडर बनण्याची ऑफर देत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महाराष्ट्रात पर्यटन व्यवसाय वाढविण्यास खूप वाव आहे आणि त्यासाठी माधुरीचा मोठा उपयोग होऊ शकेल असे या विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे असून माधुरीशी करण्यात येणार्‍या कराराला अंतिम रूप देण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

गुजराथने पर्यटनवाढीसाठी अमिताभला आणि प.बंगालने शाहरूखला अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे. त्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्र माधुरीचा विचार करत आहे. माधुरी महाराष्ट्रीयन आहेच हा त्यातला मुख्य फॅक्टर असतानाच ती राज्याच्या संस्कृती आणि परंपरेचे खर्‍या अर्थाने प्रतिनिधित्व करू शकेल असा विश्वास पर्यटन विभागाला वाटतो आहे. माधुरीकडून या विभागाला खूप अपेक्षा असून तिची लोकप्रियता आणि फॅन बेस कॅश करण्याचा हा प्रयत्न आहे असे सांगण्यात येत आहे.

सांस्कृतिक विभागाचे सचिव आनंद कुलकर्णी यांच्या मते राज्याला पर्यटन विभागात इमेज मेक ओव्हर आवश्यक आहे आणि त्यासाठी माधुरीचा विचार सुरू आहे. माधुरीचा सेक्रेटरी रिकू राकेशनाथ याने सहा महिन्यांपूर्वीच माधुरीने पर्यटन व सांस्कृतिक विभागातील संबंधितांची भेट घेतली होती असे सांगितले आहे मात्र ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून तिने अद्याप कोणत्याही करारावर सही केली नसल्याचा खुलासाही केला आहे. अर्थात ही संधी तिला मिळाली तर ती भाग्याची गोष्ट असल्याची पुस्तीही त्याने जोडली आहे.

1 thought on “धकधक गर्ल माधुरी महाराष्ट्र पर्यटन विभागाची अॅम्बॅसिडर बनणार?”

  1. नम्रता धुमाळ

    madhuri dixit is very good maharashtrian actress…it is nice to have her back in films and will help tourism in maharashtra…I like your website…..please keep posting good marathi news like it…

Leave a Comment