जोहरा सहगल शंभर वर्षांची झाली

 भारतीय सिनेमाचा प्रारंभ होण्याअगोदर एक वर्ष ती जन्मली.आपल्या अजरामर अभिनयाने आणि आनंदी, उत्साही स्वभावाने जीवन समरसून जगणारी जोहरा शुक्रवारी चक्क १०० वर्षांची झाली. चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अशा तिन्हीही माध्यमातून प्रेक्षकांच्या दिलावर जादू करणारी जोहरा पिढ्यानपिढ्या लोकांना आनंदाने जीवन जगण्याची प्रेरणा देत आली आहे.
   अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या जोहराचे वास्तव्य दिल्लीत असून आपली ओडिसी डान्सर मुलगी किरण सेहगलबरोबर ती राहते आहे.२००८ साली मिळालेले युनायटेड नेशन्स पॉप्युलर फंडचे लाडली मिडीया अॅवार्ड तिने आपल्या वागणुकीने अतिशय सार्थ ठरविले आहेच. १९९८ ला पद्मश्री, २००१चा कालिदास सन्मान २००४ सालचे संगीत नाटक अकादमीचा सन्मान आणि २०१० सालचा पद्मविभूषण सन्मान यांची मानकरी असलेल्या जोहराला ९४ साली कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते मात्र तिने जिद्दीने त्या रोगाशी लढून त्यावर मात केली.
  तरूणपणात नृत्याची खास आवड असलेल्या जोहराने १९३५ पासून उदयशंकर यांच्याबरोबर कांही वर्षे कार्यक्रम केले. चित्रकार, नर्तक कमलेश सहगल यांच्याशी विवाह केल्यानंतर पृथ्वी थिएटरशीही ती १४ वर्षे संबंधित होती. पृथ्वीराज कपूर ते राजकपूर आणि ऋषीकपूर ते रणबीर कपूर अशा कपूर घराण्याच्या चार पिढ्यांबरोबर तिने काम करण्याचे रकॉर्ड केले आहे.
  अगदी अलिकडचे हम दिल दे चुके सनम, चिनी कम हे तिचे चित्रपटही चांगलेच गाजले आहेत.
  जोहरा आपला १०० वा वाढदिवस लेक किरण आणि अगदी जवळच्या मित्रमंडळींसमवेत आपल्या घरीच साजरा करणार आहे.

Leave a Comment