आयुक्तांच्या मनमानी कारभाराला सर्वपक्षीय गटनेत्यांचा विरोध

मुंबई, दि. २५ – शहर व २०१२ उपनगरातील स्थापत्य कामे करणार्‍या कंत्राटदारांची नवीन मुदत संपली आहे. आयुक्तांनी कंत्राटदारांची संख्या ११० वरुन केवळ ३१ केली आहे. नवीन कंत्राट नियुक्त होईपर्यंत जुन्याच कंत्राटदारांना केवळ एक महिन्याची मुदतवाढ दिल्याने कंत्राटदार नाराज झाले आहेत. त्यामुळे स्थापत्य कामे रखडणार व कंत्राटदारांची संख्या कमी केल्याने कामे कशी पार पडणार या भीतीने सर्वपक्षीय गटनेते आणि सदस्यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांच्या मनमानी कारभारास तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाला फैलावर धरले.
    पालिकेने शहर व उपनगरे येथील झोपडपट्टी सुधार कामासहित इमारती दुरुस्ती व अनुवंशिक कामाची स्थापत्य कामे यांचे ११० कंत्राटदारांना दिलेले कंत्राट १ एप्रिल २०१० ते ३१ एप्रिल २०१२ कालावधीत होते. या कंत्राट कामाची मुदत संपली. २४ विभाग कार्यालये व रुग्णालये येथे ही सर्व कामे करायचे कंत्राट काम सुरु होते. आता नव्याने १ एप्रिल २०१० ते ३१ एप्रिल २०१२ मुदतीसाठी कंत्राट काम देणे आहे. मात्र, त्यासाठीच्या निवड प्रकियेला दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने जुन्याच कंत्राटदारांना हे कंत्राट काम वाढवून देण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत नवीन कंत्राट कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीची संमती मिळत नाही तोपर्यंत जुन्याच कंत्राटदारांनी कामे करण्याचा प्रस्ताव अनौपचारिक निवेदनाव्दारे आज स्थायी समितीच्या बैठकीत मांडला. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवक, गटनेत्यांनी आक्षेप घेतला.
    आयुक्त मनमानी करीत असल्याचा व नगरसेवकांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आक्षेप सभागृहनेते यशोधर फणसे यांनी केला.
    जुने कंत्राटदार एप्रिल महिना संपत असल्याने केवळ मे महिना म्हणजे एक महिना काम कसे करतील? कामे कशी काय पूर्ण होतील ? असा सवाल मनसेचे गटनेते दिलीप लांडे, भाजपा गटनेते दिलीप पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ व कॉंग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला.
    स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या वेळी सर्वपक्षीय गटनेते सदस्यांची समजूत काढीत हे अनौपचारीक निवेदन आहे अधिकृत प्रस्ताव मंजुरीला येण्यापूर्वी तोडगा काढू, असे सांगितले.

Leave a Comment