वाहन उद्योग वगळता आर्थिक टंचाईचे वर्ष

    गेले वर्ष सार्‍या जगालाच ताणाचे गेले आहे पण तुलनेने वाहन उद्योग आणि संगणक उद्योग यांना हे वर्ष बरे गेले आहे, असे म्हणण्यापेक्षा वाईट गेलेले नाही. पुण्यात प्रामुख्याने याच दोन उद्योंगांची चलती असल्याने सकृतदर्शनी हे वर्षे बरे गेले आहे. तरीही वाहन उद्योग व संगणक विश्व यांच्याखेरीज जो ऐंशी टक्के समाज राहतो तो मात्र पिचून निघत आहे. सर्वसाधारणपणे दि. १ एप्रील ते ३१ मार्च या काळात त्या त्या क्षेत्राची आर्थिक प्रगती मोजली जाते. या काळातील सार्‍या जगाचे आकडे पुढे आले आहेत. त्या आकड्याच्या आधारे ताळेबंदही मांडला जात आहे. पुण्याचा विचार करता येथे वाहन उद्योग आणि आयटी यांनी जरी हात दिला असला, तरी घरांच्या किंमती आणि सर्वसाधारण महागाई यामुळे सामान्य माणूस पिचून निघाला आहे. देशातील वाहनउद्योगात पुण्याचा सहभाग एकतृतियांश मानला जातो. अर्थात विदेशी कंपन्या आपली माहिती येथे जाहीर करत असल्याने त्यांची माहिती त्या त्या क्षेत्रातील नियतकालिकावरूनच घ्यावी लागते.
    गेल्या आर्थिक वर्षात भारतीय बाजारपेठेत वीस लाख सोळा हजार एकशे पंचावन्न मोटारी आल्या. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ २.१९ टक्के आहे म्हणजे २०१०- २०११ या आर्थिक वर्षाच्या काळात एकोणीस लाख बाहत्तर हजार आठशे पंचाहत्तर मोटारी बाजारात आल्या. याच काळात एक कोटी शहाण्णाव हजार मोटारसायकली खपल्या आणि साडेपंचवीस लाख स्कूटर्स खपल्या. स्कूटर्स व मोटारसायकल्स खेरीज छोट्या स्वयंचलित वाहनांची संख्या एक कोटी चौतीस लाख आहे. याच काळात व्यावसायिक वाहनांची विक्री आठ लाख नऊ हजार झाली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.२ टक्के आहे. पुण्यात पिंपरी, चिंचवड, तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, मुंढवा या भागांत वाहननिर्मिती करणार्‍या जागतिक पातळीवरील कंपन्यांची संख्या शंभराहून अधिक आहे. अर्थात नव्या औद्योगिक रचनेत एकाच ठिकाणी संपूर्ण वाहन निर्मिती होत नाही. विदेशी कंपन्या तर ती बाब कटाक्षाने टाळतात. या कंपन्या बहुदा अमेरिका वा युरोपमध्ये असतात. त्यांचे काही भाग आग्नेय आशियात बनवतात. त्याचे सायबर शॉप बेंगलोरला असते, तर काही महत्वाचे सुटे भाग आणि ऍसेंब्ली पुण्यात असते.
    एक्कावन्न वर्षापूर्वी पुण्यात पानशेत धरण फुटले. तेंव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी जे आर डी टाटा आणि कमलनयन बजाज यांना पुण्यात त्यांचे वाहन उद्योग नेण्यास सांगितले. त्यातून पुण्यात बजाजचा स्कूटरचा कारखाना आणि टेल्कोचा बस गाड्या आणि ट्रक तयार करण्याचा कारखाना यांचे येथे आगमन झाले. त्याच वेळी पुण्यात किर्लोस्कर यांचा ऑईल इंजिन्सचा कारखाना होता. यशवंतराव चव्हाण यांच्या मदतीने त्याच कारखान्यात डॉ नीलकंठ कल्याणी यांनी छोट्या मोठ्या वाहनांच्या इंजिनसाठी लागणार्‍या फोर्ज मटेरियलाचा कारखाना काढला. पाठोपाठ फिरोदियाही आले आणि याच सुमारास युरोपातील काही कंपन्याही वाहनांना लागणारी मशिने येथे बनविण्यासाठी आल्या. गेल्या वीस वर्षात नव्या आर्थिक धोरण सुरु झाल्यावर बहुतेक युरोपीय आणि अनेरिकन कंपन्यांना पुण्यातील वातावरण सोयीचे वाटू लागले. त्यामुळे पुणे हे जगातील एक आघाडीचे वाहननिर्मिती केंद्र झाले आहे.
    या क्षेत्रात जी विदेशी गुंतवणूक होत आहे तीही लक्ष द्यावी अशी आहे. पहिला नऊ महिन्यात अवघी सव्वादोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पण नंतरच्या तीन महिन्यात त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात झाली. त्यातील एक तृतियांश गुंतवणूक पुणे परिसरात झाली आहे. याचे खरे कारण म्हणजे जगात चांगल्या गुंतणवुकीची ठिकाणे वेगाने कमी झाली आहेत. या गुंतवणुकदारांचा अंदाज घेतला तर असे लक्षात आले की, गेले वर्ष जगाला हादरवून टाकणारे होते. ग्रीसमधील आर्थिक संकट, अमेरिकेची गोंधळलेली स्थिती, अजूनही न संपलेली आर्थिक मंदी, युरोपातील बँकांच्या दिवाळ्यांची मालिका, अडचणीत आलेला युरो यामुळे सारे जग हादरून गेले आहे. त्यामुळे सध्यातील भारतात गुंतवणूक करण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थात जी गुंतवणूक झाली ती सारी फायद्यात आली असे झालेले नाही. मुंबई शेअर बाजारात गेल्या वर्षीत दहा टक्के शेअर नुकसानीतच गेले आहेत. पण बाकीच्यांची स्थिती बरी असल्याने भारतीय बाजारातील गुंतवणूकदार फारसे नाराज होण्याच्या स्थितीत नाहीत.
    याच काळात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्यांच्या कामातून पुण्यात जवळजवळ तीस हजार कोटी आले आहेत. पुणे एकेकाळी येथे अमेरिकेची कामे मोठ्या प्रमाणावर येत होती. पण सध्या अमेरिकेची कामे कमी झाली आहेत. कारण तेथील उद्योगांची स्थिती बरी राहिलेली नाही. आणि भारतापेक्षाही ही कामे स्वतात करून देणारा अजून एक महाकाय देश पुढे आला आहे तो म्हणजे चीन. त्याचा असा परिणाम दिसत आहे की, सध्या जरी या क्षेत्रात चांगले पगार असले तरी पुढील दोन वर्षात ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. ज्या तरुणांना सध्या एक लाख रुपयापेक्षा अधिक वेतन आहे अशांना या परिस्थितीची जाणीव व्हायला लागली आहे. यांनी आपल्या आय टी कौशल्याला नवनवीन विषयाची जोड देण्यास सुरुवात केली आहे. सध्या या आय टी कंपन्या जगातील पुण्यात बसून अनेक कंपन्यांचे बिझिनेस सांभाळत असतात. भारतीय लोकांची इंग्रजीतील तयारी याचा चांगला उपयोग होतो.
    या पैशामुळे मात्र येथील सामान्य माणूस पुरा हादरून गेला आहे. कारण त्यामुळे येथील घरांच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. सहकारनगर, सिंहगडरोड. एरंडवन, कोथरुड, सेनापती बापट रोड, वारजे माळवाडी, बाणेररोड, खडकी, आळंदी रोड, नगररोड, मगरपट्टा, कोंढवा या भागांत आता चौरस फुटाला दहा हजार रुपये हा दर सुरु झाला आहे. पुण्यात वाहन उद्योग, व आय टी यांचा थोडाफार पैसा दिसला तरी पंचाऐशी टक्के लोक अजून जुन्या पंधरा ते पंचवीस हजार रुपये पगाराच्या चौकटीतच आहेत. त्याना पुण्याचे जिणे अवघड होऊन बसले आहे. हॉटेल, कापडबाजार व अन्य मॉलमधील माल यांच्या किंमती भारतात सर्वाधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

1 thought on “वाहन उद्योग वगळता आर्थिक टंचाईचे वर्ष”

Leave a Comment