
नवी दिल्ली दि.२६-जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहारांचे रेटींग देणार्या स्टॅन्डर्ड अॅन्ड पुअर्स (एस अॅन्ड पी) संस्थेने भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे मत नोंदवितानाच भारताच्या पतमानांकनाचे रेटिंग आऊटलूक घटविले असून ते स्टेबलवरून निगेटिव्हवर आणले आहे. इतके करून ही संस्था थांबलेली नाही तर दोन वर्षात भारताने आपली वित्तिय स्थिती सुधारली नाही तर ही पत आणखी घटविली जाईल असा सज्जड इशाराही दिला आहे.
भारतात राजकारण अर्थकारणाच्या वरचढ ठरते आहे आणि उद्योगक्षेत्राला मागे खेचण्याचे काम केंद्र सरकार करते आहे असे मत व्यक्त करतानाच सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबतचा भारताचा दृष्टीकोन निराशाजनक आहे असेही संस्थेचे म्हणणे आहे.
मूडीज अॅनॅलिस्टीक्स या एस अॅन्ड पीच्या सहयोगी संस्थेचे वरीष्ठ अर्थतज्ञ ग्लेन लेविन यांनीही सुमार व्यवस्थापनाने भारताची अर्थव्यवस्था क्षमतेपेक्षाही खाली घसरली असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताची राजकीय प्रक्रिया गतीमान करण्याची संधी दवडल्याबद्दल त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर भारताने आर्थिक स्थितीत तातडीने सुधारणा केली नाही भारत ट्रीपल बी ग्रेडखालीही घसरू शकतो असा इशारा दिला आहे.
भ्रष्टाचार, गैरव्यवहार बोकाळले असतानाच जमीन सुधारणा, इंधन सवलती, मजूर हक्क, रिटेल सेक्टरमधील सुधारणा प्रत्यक्षात आल्याच नसल्याचे स्पष्ट करून ग्लेन म्हणतात की सरकारने विधेयके मंजूर करूनच घेतलेली नाहीत आणि त्यामुळेच हा प्रश्न मिर्नाण झाला आहे.
भारताच्या या आर्थिक पत घसरणीमुळे बाह्य व्यावसायिक भांडवल उभारण्यात देशाला अडचणी येऊ शकतात असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे.