सातार्‍याजवळ अद्ययावत भूकंपशास्त्र अभ्यासकेंद्र उभारणार – मुख्यमंत्री

सातारा, दि. २५ – केंद्र सरकारच्या मान्यतेने कायमस्वरुपी व व्यावसायिक गरजेनुसार वीजनिर्मितीसाठी कोयनेमध्ये पाचवा टप्पा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. भूकंपशास्त्राचा विश्‍वविद्यालय धर्तीवर अभ्यास करण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च करुन आशिया खंडातील अद्ययावत भूकंपशास्त्र अभ्यासकेंद्र सातारानजीक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केली.
    कोयना जलविद्युत प्रकल्पातील चौथ्या ऐतिहासिक लेकटॅपिंगच्या उद्घाटनाच्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, सातार्‍याचे पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  भूकंपशास्त्र अभ्यासकेंद्र उभारताना धरणग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी जास्त वेळ न घालवता प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर पूर्तता केली जाईल असे सांगून महाराष्ट्राच्या गतिमान प्रगतीसाठी जलसिंचन आणि वीजनिर्मितीसाठी प्राधान्य देऊन सर्वांनीच कार्यरत राहण्याचे आवाहनही केले.
    कोणत्याही क्षणी कोणतेही संकट निर्माण होऊ शकते. याची प्रत्येक मिनिटाला जाणीव ठेवत, कार्यरत असणार्‍या कोयना जलविद्युत प्रकल्पातील सर्वांनीच आपल्या सांघिक कार्यशक्तीच्या आधारे प्रतिकूल परिस्थितीवर हे लेकटॅपिंग यशस्वी केले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेतर्फे अभिनंदन केले. या तांत्रिक करामतीच्या परिपूर्तीमुळे भविष्यात विनाखंड वीजनिर्मिती होईल आणि त्याचबरोबर ताकारी, म्हैसाळ, टेंभू पाणी योजनेचा पाणी प्रश्नही लवकर मिटेल, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
अधिकार्‍यांचा सन्मान करावा – उपमुख्यमंत्री
सर्वांना अभिमान वाटावा अशीच कामगिरी कोयना अभियांत्रिकी ते कर्मचारी टीमने केली आहे. यामध्ये मोलाचे योगदान देणार्‍या अधिकारी वर्गाचा मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर स्नेहभोजनासह सन्मान करावा आणि त्यांना भरीव पगारवाढ देऊन त्यांच्या कार्याचा यशोचित गौरव करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला टँकरने पाणी पुरवठा करावा लागू नये, यासाठी सूक्ष्मनियोजन करुन त्याची सर्वांनीच अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आजचा हा ऐतिहासिक क्षण पुन्हा अनुभवण्यास मिळावा अशी अपेक्षा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
    महाराष्ट्राच्या विकासात वीजनिर्मितीत मोलाचे योगदान देणार्‍या कोयना धरणाला आपल्या पिढीजात स्वमालकीच्या शेतजमिनी देऊन या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे लांबलेले पुर्नवसन त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेसह देणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्याची सत्वर परिपूर्ती व्हावी अशी अपेक्षा सातार्‍याचे पालकमंत्री रामराजे नाईक – निंबाळकर यांनी व्यक्त केली.

Leave a Comment