रॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे परिक्षा केंद्र पुण्यात सुरू

royal

पुणे दि. २४- लंडन येथील प्रसिद्ध रॉयल कॉलेज ऑफ सर्जनने आपले महाराष्ट्रातील पहिले व देशातील दुसरे पात्रता परिक्षा केंद्र पुण्यात सुरू केले असून त्यासाठी पुण्याच्या एमआयटी स्कूल ऑफ हेल्थ केअरशी सहकार्य करार केला आहे.
  जनरल फिजिशियनना युकेत सर्जन म्हणून काम करावयाचे असेल तर पूर्वी थेट एफआरसीएसला प्रवेश घेता येत असे. आता मात्र त्यासाठी प्रथम एमआरसीएस ही पात्रता परिक्षा द्यावी लागते व नंतरच एफआरसीएसला प्रवेश घेता येतो. रॉयल कॉलेज ऑफ सर्जनची फेलोशिप मिळणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. मात्र यापूर्वी पात्रता परिक्षा देण्यासाठी भारतात केवळ कोलकाता येथे जावे लागे अन्यथा थेट युके गाठावे लागत असे. आता मात्र पुण्यातही हे केंद्र सुरू झाल्याने अनेकांची सोय होऊ शकणार आहे. या केंद्रातून भारताबरोबरच पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, इराण, इराक या देशांतील डॉक्टर्सची पात्रता परिक्षा देऊ शकणार आहेत, असे आरसीएसचे माईक पार्कर यांनी सांगितले. आरसीएस आणि एमआयटी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला पार्कर यांच्यासमवेत एमआयटीचे विश्वनाथ कराड हेही उपस्थित होते.
  एमआरसीएसची पात्रता परिक्षा घेण्यासाठी लंडनहून १६ सदस्यांचे एक पथकही पुण्यात आले असून, तेही या सामंजस्य कराराच्यावेळी उपस्थित होते.