
पाण्याला आपल्या संस्कृतीमध्ये जीवन म्हटले जाते. कारण पाण्याशिवाय जगणे कठीण आहे. परंतु आपण ज्या गांभीर्याने पाण्याला जीवनाची उपमा देतो त्या गांभीर्याने पाण्याची काळजी करतो का, असा प्रश्न आपल्या मनाला विचारला तर स्पष्टपणे नकारार्थी उत्तर येईल. आपण पाण्याचा वापर बेदरकारपणे करत असतो. मात्र ही बेदरकारी अशीच जारी राहिली तर एक दिवस आपल्यावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. ती टाळायची असेल तर पाण्याची उपलब्धता, त्याचा वापर, व्यवस्थापन आणि जलसंधारण या सर्व गोष्टींचा नीट विचार करायला हवा आणि लोकांनी तो तसा करावा म्हणून संयुक्तराष्ट्र संघटनेने २४ एप्रिल हा दिवस जलसंपदा दिन म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. आज साऱ्या जगामध्ये पाण्यावर विचार केला जात आहे. हा विचार न केल्यास आपल्याला एक दिवस पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतो त्या पद्धतीने वॉटर पंपावर पैसे देऊन लिटरच्या हिशोबात मोजून पाणी घ्यावे लागेल. ही आपत्ती टाळायची असेल तर जे जे लोक पाणी वापरतात त्या सर्वांनी पाण्याच्या बचतीचा आणि जलसंपदा वाढवण्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
आपण सर्वसाधारण लोक पाण्याचा अपव्यय फार मोठ्या प्रमाणावर करत असतो. आपण एखाद्या शहरामध्ये चक्कर मारली तर तोट्या नसलेले अनेक नळ वाहत असलेले आपल्याला दिसतात. माणसाने पाण्याची बचत केली पाहिजे, अर्धी बादली पाण्यात आंघोळ केली पाहिजे हे तर खरेच; पण एकवेळ आंघोळीला जास्त पाणी वापरले तरी चालेल पण उगाच पाणी वाया घालवण्यात काय अर्थ आहे? याचा विचार या नळाचे मालक करत नाहीत. आपण सहजा सहजी आणि चार-पाच रुपयांचे बूच आणण्याचा कंटाळा करून जेवढे पाणी व्यर्थ घालवतो तेवढे पाणी तयार करायला आणि शुद्ध करायला नगरपालिकेला काही शे रुपये खर्च आलेला असतो. आपले माय-बाप सरकार हा सारा खर्च आपल्या डोक्यावर बसवत नाही, म्हणून आपल्याला पाणी फुकट मिळते. मात्र एक घागर पाणी पाईपलाईनमधून पाणी पुरवठा योजनेपर्यंत आणणे आणि तिथे ते शुद्ध करून नळातून घरोघर पोचवणे यासाठी नगरपालिकेला ३० ते ४० रुपये खर्च आलेला असतो. पाणी वाया घालवणारे लोक याचा विचार करत नाहीत. कारण त्यांनी पाण्याचा कधी विचारच केलेला नसतो. पाणी हे जपून वापरण्याचे साधन आहे आणि ते जपून न वापरल्यास घागरी काखोटीला मारून रानोमाळ फिरण्याची वेळ आपल्यावरच येणार आहे याची थोडीशी सुद्धा जाणीव या लोकांपर्यंत पोचलेली नाही.
आपल्या देशातल्या लोकांमध्ये नागरिकत्वाच्या कर्तव्याची भावना कधीच वाढीला लागलेले नाही. असे नेहमी म्हटले जाते आणि हे खरेही आहे. परंतु भारतीय लोकांच्या बेजबाबदारपणा पाण्याच्या चुकीच्या वापरातून क्षणोक्षणी प्रत्ययाला येत असतो. जी वस्तू मोफत मिळते तिची किमत लोकांना कळत नाही. खरे म्हणजे पाणी मोफत मिळते किंवा स्वस्त मिळते हे सर्वार्थाने खरे नाही. पाण्यासाठी प्रत्यक्षात पैसा कमी घेतला जातो आणि नगरपालिकेला पाणी पुरवठा योजनेवर भरपूर तोटा होत असतो. परंतु हा तोटा नगरपालिका आपल्या नागरिकांवर दुसरे कसले तरी कर लावून वसूल करीत असतेच. म्हणजे पाण्याचा तोटा नळपट्टीच्या माध्यमातून नागरिकांकडून वसूल केला जात नसला तरी तो शिक्षण करातून किंवा अन्य कुठल्या तरी करातून वसूल केला जातच असतो. परंतु लोकांना हे कळत नाही. आपल्याला नळपट्टी कमी येत आहे यातच ते समाधान मानतात आणि पाणी वाया घालवतात. मात्र शेवटी हे पैसे आपल्यालाच भरायचे आहेत हे त्यांच्या मठ्ठ डोक्यात येतच नाही. कारण आपल्या देशातल्या लोकांमध्ये जलसाक्षरतेचा अभाव आहे आणि या निरक्षरतेमुळे आपण अनेक प्रकारांनी पाणी वाया घालवत असतो.
आपल्याला पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत. पिण्यासाठी काल भरलेले पाणी आपण आज सकाळी उठल्याबरोबर शिळे झाले म्हणून फेकून देतो आणि नवे ताजे पाणी भरतो. नळाला पाणी आल्यानंतर घरोघरी चक्कर मारल्यास शिळे पाणी भडाभडा फेकून दिल्याचे आणि ताजे पाणी भरण्याची लगबग सुरू असल्याचे आपल्याला दिसते. पाणी कधीच शिळे होत नसते आणि ताजेही होत नसते. आपल्याला पुरवले जाणारे पाणी गावाच्या जलाशयामध्ये महिनोन्महिन्यांपासून साठवलेले असते. मग ते ताजे किवा शिळे कसे होईल, असा प्रश्न कोणाच्याच डोक्यात येत नाही. त्यातल्या त्यात दुर्दैवाची बाब अशी की, हे शिळे झालेले पाणी लोक मोरीत तसेच फेकून देतात. त्या पाण्यामध्ये धुणे धूता येते, फरशा धुता येतात, या शिळ्या पाण्याचे आंघोळ केल्याने काही बिघडत नाही. हे शिळे पाणी संडासात सुद्धा वापरता येत असते. परंतु शिळे पाणी म्हणजे काही तरी घाणेरडी वस्तू आहे असे समजून ते भडाभडा मोरीतच ओतून देण्याकडे लोकांचा कल असतो. कमालीची पाणीटंचाई असणार्या गावात सुद्धा हा प्रकार सुरू असतो. आपण याबाबतीत जोपर्यंत शहाणे होत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावर पाण्याच्या गंभीर टंचाईची तलवार कायमची टांगलेली राहणार आहे