वॉशिग्टन दि.२५- आशियात नव्याने महासत्ता म्हणून उदयास येत असलेला चीन आणि इराण यांच्याकडून अमेरिकेला असलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेने पेंटॅगॉनच्या मदतीने या देशांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी नवी गुप्तवार्ता संस्था स्थापन केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण सचिव लीऑन पेनेस्टा यांनी गेल्याच आठवड्यात या योजनेला मंजुरी दिली होती ,त्यानुसार ही नवी डिफेन्स क्लँडेस्टाईन सर्विस सुरू करण्यात आली आहे. सीआयएच्या मदतीनेच ही संस्था अधिक दक्षतेने कार्य करणार असून इराण आणि अफगाणिस्तानच्या युद्धभूमीवरून दूर होत असताना आपले अधिकारी सावधगिरी म्हणून योग्य ठिकाणी असतील आणि गरजेच्या वेळी ते कधीही पुन्हा कार्यरत होऊ शकतील अशी काळजीही घेण्यात येणार आहे.
एका संरक्षण अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने अलिकडच्या काळात प्रामुख्याने दहशतवादाला आळा घालण्याकडेच आपले सारे लक्ष केंद्रीत केले होते. पण आता ओबामा प्रशासनाने आशियातील सुरक्षा प्रश्न तसेच नव्याने महासत्ता बनू पाहात असलेल्या चीनवरही लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. या नव्या संस्थेसाठी कोणतीही नवी पदभरती अथवा जादा पैसा देण्यात आलेला नसून सीआयए व अन्य अमेरिकन गुप्तवार्ता संस्थातीलच अधिकारी या नव्या संस्थेसाठी काम करणार आहेत.
लेफ्टनंट जनरल मायकेल टी. फ्लॅमी यांची नेमणूक जाहीर होऊन आठवडा लोटतो आहे तोवरच या नव्या गुप्तवार्ता संस्थेची घोषणा करण्यात आली आहे. फ्लॅमी यांची कारकीर्द अतिशय उज्ज्वल असून त्यांना जॉइंट स्पेशल ऑपरेशन कमांडसाठी काम करण्याचा मोठा अनुभव आहेच पण दहशतवाद आणि इनसर्जंट नेटवर्क समजून घेण्यासाठी त्यांनी अनेक नवी गुप्तवार्ता कौशल्येही विकसित केली आहेत. अफगाणिस्तानातील टॉप इंटेलिजन्स अधिकारी अशी त्यांची ओळख असून त्यांच्याच कार्यकाळात एक वर्षापूर्वी जेएसओसीच्या सहकार्याने ओबामा बिन लादेनवर यशस्वी रेड टाकण्यात आली होती.