कोयना ‘लेक टॅपिंग’

महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पात येत्या बुधवारी होत असलेले दुसरे ‘लेक टॅपिंग’ म्हणजे जागतिक पातळीवर प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा लौकिक वाढविणारे यशस्वी पाऊल आहे. 

भारताच्या मराठी तंत्रज्ञांनी पराकोटीचे प्रयत्न करुन आशिया खंडातील यशस्वी केलेला हा दुसरा ‘लेक टॅपिंग’ प्रयोग आहे. उच्चत्तम तंत्रज्ञानामध्ये भारताची मान उंचाविणाऱ्या या दुसऱ्या ‘लेक टॅपिंग’ प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्तांची तहान भागविली जाणार असून राज्याचं विनाव्यत्यय वीज निमिर्तीचं स्वप्न साकार करणाऱ्या या ‘लेक टॅपिंग’ अर्थात जलाशय छेद प्रक्रियेविषयी थोडंसं.. ..

कोयना जलविद्युत प्रकल्पात पहिले लेक टॅपिंग १३ मार्च १९९९ रोजी यशस्वीरित्या केले. तर येत्या बुधवारी दुसरे ‘लेक टॅपिंग’ यशस्वीरित्या होत आहे, कोयनेच्या लेक टॅपिंगसाठीचे तंत्रज्ञान हे परदेशातून आणलेले तंत्रज्ञान नसून सर्व काही मराठी तंत्रज्ञांनी पराकोटीचे प्रयत्न करुन देशाची मान जगात उंचावण्याचे केलेले हे महान कार्य आहे. 

सध्या कोयना प्रकल्पातून होत असलेली ३५० कोटी युनिट वार्षिक वीज निर्मिती दुसऱ्या ‘लेक टॅपिंग’ मुळे यापुढे विनाव्यत्यय (अखंडीतपणे) होणार आहे. तसेच कृष्णा लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राला वीज निर्मितीसाठी मिळणारे २५ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरणे आता शक्य होणार आहे. या २५ टीएमसी अतिरिक्त पाण्यामुळे १२० कोटी युनिट वीज जनरेट करता येणे शक्य आहे. 

येत्या बुधवारी कोयना प्रकल्प देशाला अर्पण केला जात असून या ‘लेक टॅपिंग’ मुळे दुष्काळग्रस्तांची तहान भागविली जाणार आहे तसेच राज्यातील अंध:कार संपून अखंड प्रकाशाने महाराष्ट्र उजळून निघणार आहे. ही क्रांती या ‘लेक टॅपिंग’ प्रकल्पामुळे घडते आहे, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. 

कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये होत असलेला जलाशय छेद प्रक्रियेचा हा आशिया खंडातील दुसरा प्रयोग असून यापूर्वी १३ मार्च १९९९ रोजी कोयना जलाशयातच ‘लेक टॅपिंग’चा आशिया खंडातील पहिला प्रयोग यशस्वी करण्यात आला. 

जलाशयाच्या खाली नियंत्रित विस्फोटाद्वारे बोगद्याच्या आकाराचे छिद्र करुन बोगद्यात पाणी घेणे या प्रक्रियेस ‘लेक टॅपिंग’ म्हणजेच जलाशय छेद प्रक्रिया संबोधले जाते. ही प्रक्रिया नॉर्वेजियन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ‘लेक टॅपिंग’साठी बोगद्याची कामे जलाशयाच्या खाली फक्त ५ ते ६ मीटर जाडीचा रॉक प्लग ठेवून पूर्ण केली जातात व बोगद्यात गेट टाकून हा रॉक प्लग शेवटी नियंत्रित विस्फोटाद्वारे उडविली जातो. 

कोयना जलविद्युत प्रकल्पातील दुसरे ‘लेक टॅपिंग’ हे टेंभू – ताकारी योजनेतील दुष्काळग्रस्तांना २१ टीएमसी पाणी शेती आणि पिण्यासाठी देण्याबरोबरच एप्रिल, मे, जून मध्येही अखंडीत विद्युतनिर्मिती करण्यास सहायभुत ठरणाऱ्या या दुसऱ्या जलशय प्रक्रियेची काही ठळक वैशिष्टे असून ती पुढीलप्रमाणे आहेत:- 

• दुसऱ्या ‘लेक टॅपिंग’ चा प्रयोग पहिल्या ‘लेक टॅपिंग’ च्या तुलनेत दुप्पट खोलीवर घेतला जाणार आहे

• या प्रयोगात रॉक प्लगमध्ये ४५ अंश च्या कोनाऐवजी ८० अंशच्या कोनात अंतिम ड्रिलिंग केले. यामुळे रॉक प्लगमध्ये करावे लागणारे अंतिम ड्रिलिंग पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत कमी झालेले आहे.

• या प्रयोगात प्लास्टिक प्रकारची विस्फोटके वापरण्यात आली असून सदर विस्फोटके प्रथम प्लास्टिकच्या पाईपमध्ये भरुन नंतर ती रॉक प्लगमध्ये लोड करण्यात आली आहेत.

• या प्रयोगात अंतिम विस्फोटासाठी वापरण्यात आलेले डिटोनेटर्स हे नॉन इलेक्ट्रिक या प्रकाराचे असल्याने कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेत पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत जास्त वाढ झाली आहे.

• या प्रकल्पासाठी बसविण्यात आलेले आपत्कालिन दरवाजे हे एकसंध प्रकारचे असल्याने त्यातून होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे. 

‘लेक टॅपिंग’ हा प्रयोग प्रगत महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या गतिमान उपक्रमातील महत्वाचा टप्पा म्हणून कार्यान्वित होत आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हा योग जुळून येतोय हाही योगायोगच आहे. 

या प्रकल्पाच्या यशस्वीतेत बिनीचे शिलेदार म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता दीपक मोडक असून त्यांनी आपल्या तज्ञ, अनुभवी अभियंता,तंत्रज्ञ तसेच कारागीरांच्या सहाय्याने हा महाप्रकल्प साकार केला आहे. 


1 thought on “कोयना ‘लेक टॅपिंग’”

  1. koyana prashna kadhi sutnar ???????? goverenment should look into it…thanks for publishing this marathi news.

Leave a Comment