रायपूर, दि. २४ – सुकता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एलेक्स पॉल मेनन यांच्या सुटकेसाठी मध्यस्ती करण्यास प्रशांत भूषण यांनी नकार दिला आहे. मेनन यांच्यासाठी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी नक्षलवाद्यांना आवाहन केले होते तेव्हा मंगळवारी नक्षलवाद्यांनी मध्यस्थीसाठी प्रशांत भूषण, बी. डी. शर्मा आणि मनीष कुंजम या तिघांची नावे सुचविली होती. छत्तीसगड सरकारने सुद्धा मध्यस्तीसाठी निर्मला कुंच, एस. के. मिश्रा आणि बी. डी. शर्मा यांची नावे सुचविली आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आपण नक्षलवाद्यांना मेनन यांच्या सुटकेसाठी आवाहन करू शकतो. परंतु मध्यस्थीचे काम करणे शक्य नसल्याचे सांगितले. तसेच मनीष कुंजम यांनी देखील मध्यस्थीसाठी नकार दिला आहे. परंतु बी. डी. शर्मा यांनी मध्यस्थी करण्यासाठी आपली संपूर्ण तयारी दाखविली आहे.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी अस्थमाचे रूग्ण असलेल्या जिल्हाधिकारी मेनन यांची तब्येत खराब असल्याचे सरकारला कळविले असून पीयूसीएलचे उपाध्यक्ष विनायक सेन यांनी नक्षलवाद्यांना मेनन यांची लवकरात लवकर सुटका करण्याचे तसेच मेनन यांची सुटका होईपर्यंत त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याचे आवाहनदेखील केले आहे.