सेन्सॉर बोर्डाची पंधरा संहितांना मान्यता

पुणे, दि. २३ – मराठी रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डाची मासिक बैठक सोमवारी संपन्न झाली. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पंधरा संहितांना मान्यता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
    प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक वामन केंद्रे, नाटककार शफाअत खान, जयंत पवार, अभिनेत्री सुषमा देशपांडे यांच्यासह आशा काळे, मधू कांबीकर, लीला गांधी, सुनील महाजन, योगेश सोमण हे पुण्यातील रंगकर्मी मराठी रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आहेत. तर डी. जी. गायकर सचिव आहेत. मराठी रंगभूमीवर सकस आणि दर्जेदार नाट्यसंहिता याव्यात या उद्देशाने राज्य सरकारने ज्येष्ठ रंगकर्मींचा समावेश असलेल्या मराठी रंगभूमी सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे. ४६ सदस्य आणि अध्यक्ष अशी रचना असलेल्या या बोर्डाचे सचिव हे मानद सदस्य आहेत. बोर्डाच्या घटनेनुसार बोर्डाची महिन्यातून एकदा बैठक होणे गरजेचे असते.
    आज झालेल्या बैठकीत १७ सदस्य उपस्थित होते. यामध्ये १५ नाट्यसंहितांना मान्यता देण्यात आली आहे. पुढील महिन्यात ही बैठक कोल्हापूर येथे होणार आहे. या बैठकीमध्ये रंगभूमीविषयक घटनांचा आढावा, कोणत्या सदस्यांकडे वाचनासाठी किती संहिता आल्या आहेत, या संदर्भातील मागोवा घेतला जातो.

Leave a Comment