हिरो शाहिदला अखेर पोलिसांचाच आधार

बॉलिवूडमधील हिरो चित्रपटात कितीही अशक्य गोष्टी सहजी करत असले तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र अनेकवेळा त्यांना किरकोळ बाबींसाठीही पोलिसांची मदत मागायची वेळ येते. तिथे त्यांची हिरोगिरी कांहीच करिष्मा दाखवू शकत नाही याचा अनुभव सध्या चिकणा हिरो म्हणून लोकप्रिय असलेला शाहिद कपूर घेतो आहे.

घडलेय असे की शाहिदला गेले काही दिवस एका पोरीने जाम हैराण केलेय. त्यातून ही पोरगी साधीसुधी नाही तर ती आहे एक काळ गाजविणार्‍या राजेंद्रकुमार यांची मुलगी. तिचे नांव विमनस्कता. आपल्या नावाला साजेसे वर्तन ही पोरगी करत असून ती शाहिदच्या शेजारीपाजारी आपण त्याची बायको असल्याचे सांगते आहेच.

पण वेळीअवेळी त्याच्या इमारतीत घूसून त्याच्या दाराची बेल वाजवत राहणे, शूटींगच्या ठिकाणी त्याचा पाठलाग करणे, त्याच्या कारच्या बॉनेटवरच ठाण मांडून बसणे, त्याची वाट अडवणे असले प्रकारही ती करते आहे. तेहतीस वर्षीय विमनस्कताने २००६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते असे म्हणतात. पण ती आली कधी आणि गेली कधी कुणालाच काय पण तिचे तिलाही कळले नसावे.

शाहिदची आणि तिची ओळख झाली ती शामक दावरच्या नृत्यवर्गात. या घटनेलाही कांही वर्षे लोटली आहेत.  शाहिदला पाहताच तिचा कलिजा खलास झाला होता आणि आता ती शाहिदच्या पाठीच पडली आहे.

मात्र या सार्‍या प्रकाराने हैराण झालेल्या शाहिदने अखेर शनिवारी वर्सोवा पोलिस ठाण्यात आपले गार्‍हाणे मांडून मदतीची याचना केली असल्याचे समजते. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून ही तक्रार नोंदविली आहे. मात्र सध्या विमनस्कता गायबच असल्याने तिला शोधून ताकीद दिली जाईल असे पोलिस अधिकारी सांगत आहेत.

Leave a Comment