एडलवाइस टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी वयाच्या दहापट विमा उतरविणार

पुणे ता. २३ : प्रणव मुखर्जी यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात विमेदाराच्या वयाच्या दहापट विमा उतरविण्याचा जो नियम केला आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, त्यात वयाच्या अटीबाबत लवचिकता हवी असल्याचे एडलवाइस टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक मित्तल यांनी आज येथे निवडक पत्रकारांना सांगितले.
    आयुर्विमा क्षेत्रातील एडलवाइस टोकियो लाईफ ही २४ वी कंपनी आहे.  जपानमधील टोकियो लाईफ आणि भांडवल बाजारातील एडलवाइस यांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली.  महाराष्ट्रात ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या शहरांत शाखा  सुरु केल्या असून मेच्या  पहिल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये शाखा विस्तार केला जाणार आहे. सध्या विमा कंपन्या आक्रमक मार्केटिंग करतात. त्याचा तोटाच अधिक होतो त्यामुळे आम्ही नियंत्रित वाढीवर भर देणार आहोत असे सांगून ते म्हणाले विमा प्रतिनिधी चांगले प्रशिक्षित असतील याची काळजी घेतानाच  ४० पेक्षा कमी वयोगटाच्या शहरी ग्राहकांवर  अधिक भर दिला जाईल.
    विमा घेणार्‍या ग्राहकाला जोखीम किती असू शकते आणि ती पेलण्याची क्षमता कशी मिळवायची यावर आमचा भर राहील. अर्थसंकल्पात विमा किती असावा, याबाबतची चांगली सूचना असणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकला दहापट विमा हप्ता भरणे परवडेल का हे पहायला हवे.
    महाराष्ट्रात २०१५ पर्यंत ५००० जणांना विमा व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचे आणि दोन लाख ग्राहकांचा विमा उतरविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे अशी माहिती त्यांनी दिली. जगाचा विचार करता विमा उद्योगात पाश्चिमात्य देशात ४०-५० कंपन्या आहेत. त्यामुळे भारतात ही संख्या २५ पर्यंत जाणे यात काही अशक्य नाही असेही ते म्हणाले.

Leave a Comment