पृथ्वीराज चव्हाणही वापरतात खुर्ची वाचविण्याच्या गावठी क्लृप्त्या – तावडे

पुणे, दि. २२ – मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचविण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांचीच ट्रीक वापरत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी येथे केली. उत्तरेकडील राजकारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना चांगले जमते, असा टोलाही त्यांनी लगाविला.
    भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या महाबैठकीचा समारोप विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
    ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे खुर्ची वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि उद्योगमंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये होते. मात्र आपली खुर्ची वाचविण्यासाठी  पृथ्वीराज यांनी त्यांची नावे कुठे, कुठे आहेत, याचा अहवालच दिला आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख आणि उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही यापूर्वी अशाच प्रकारची ट्रीक वापरली होती. खुर्ची धोक्यात आली की या प्रकारच्या खेळ्या केल्याच जातात.
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सुधीर मनगुंटीवार यांनी नुकतेच संकेत दिले होते. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही मित्रपक्ष आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासूनची आमची युती आहे. युती करू, असे बोलल्यामुळे युती होत नाही. त्यासाठी चर्चा होऊन दोन्ही पक्षांची मान्यता हवी, असते असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या ज्या पद्धतीने पक्ष एकत्र येत आहेत, त्याला मोठ्या निवडणुकीच्या दृष्टीने फारसा अर्थ नाही. एकाच टीममधील खेळाडू ज्या पद्धतीने आयपीएलमध्ये एकमेकाविरोधातही खेळतात, त्याचप्रमाणे सध्या सर्वच राजकीय पक्षांचे सुरु आहे. विधानसभा निवडणुका येताच हे सारे थांबेल, असेही त्यांनी बोलून दाखविले.

Leave a Comment