पाणी वितरणातील खाजगीकरणाचा डाव उधळून लावा – ग्राहक पंचायतीचे आवाहन

औरंगाबाद दि. २१  – पाणी वितरणात खाजगीकरण करून पाण्यावर स्वागतमूल्य लावण्याचा विचार हा ग्राहकांपुढे मोठे संकट उभे करणारा असल्यामुळे ग्राहकांनी वेळीच सावध होवून हा डाव उधळून लावावा, असे आवाहन अ. भा. ग्राहक पंचायतीने केले आहे. अ. भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना या विषयावर जनजागरण करणार असल्याची घोषणा केली.
    नुकतेच पुणे येथे झालेल्या अ. भा. ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय बैठकीत अरूण देशपांडे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी येथे ही पहिलीच पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी या बैठकीत एकमताने निवडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नावे पुढीलप्रमाणे जाहीर केली. अध्यक्ष अरूण देशपांडे, महामंत्री सोमनाथ खेडकर दिल्ली, उपाध्यक्ष रविंद्र सोळंके उस्मानाबाद, नारायण भाई शहा बडोदा, राष्ट्रीय सचिव अशोक त्रिवेदी नागपूर, कोषाध्यक्ष अरूण खंडेलवाल मुझफ्फरनगर. या बैठकीच्या काळातच भैय्युजी महाराज यांचे शोषणमुक्त आधुनिक भारत या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी, मार्गदर्शक श्रीकांतजी जोशी, दिलीप फडके, सूर्यकांत पाठक आदी उपस्थित होते.
    या पत्रकार परिषदेत ग्राहक पंचायतीची भूमिका मांडताना अरूण देशपांडे म्हणाले की, पाणी वितरणाच्या विषयात लोकांचा सहभाग, खाजगीकरण असे विषय फसवे आहेत. पाणी वितरणात खाजगीकरण करून लागतमूल्य जर सुरू झाले तर ग्राहकांना मोठ्या संकटांला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या धोरणाला विरोध केला पाहिजे. किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा विषयही असाच फसवा आहे. शेतकर्‍यांना सुरूवातीला चांगला भाव देवून अवलंबित्व तयार झाल्यावर शोषण  होवू शकते. मोठ्या संख्येने या क्षेत्रात असलेल्या छोट्या व्यापार्‍यांवर हे मोठे संकट आहे. दीड कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी आणि कर्मचारी बेकारीच्या खाईत लोटले जातील. यामुळे या विषयाला ग्राहक पंचायतचा तीव्र विरोध आहे असे ते म्हणाले.