गोव्यातील सर्व पेट्रोलपंप आज बंद

पणजी, दि. २२ – आपल्या प्रदीर्घ मागण्यांसाठी अखिल भारतीय पेट्रोलपंप संघटनेने दिलेल्या सोमवारच्या बंदमध्ये गोव्यातील सर्व पेट्रोलपंपही सहभागी होणार आहेत. सोमवारी संपूर्ण दिवसभरात राज्यातील सर्व पंप बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
    देशभरातील पेट्रोलपंप चालकांनी सोमवारच्या कडकडीत बंदची हाक दिली आहे. गोव्यातील पेट्रोलपंप चालक संघटनाही त्यात सहभागी होणार आहे. राज्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर येत्याच महिन्याभरातच पेट्रोलचे दर ११ रूपयांनी खाली आणले होते. गोव्यातील वाहन चालक व जनता या निर्णयाने खूष आहे, परंतु संघटनेच्या काही जुन्या मागण्या तशाच पडून आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्याच्या अखिल भारतीय बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे संघटनेचे स्थानिक अध्यक्ष परेश जोशी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
    गोव्यात पेट्रोलचे दर खाली आल्यानंतर शेजारी राज्यात त्याची विक्री होऊ नये. यासाठी बाटल्या व कॅनमधून सुटे पेट्रोल न देण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. मात्र हा निर्णय योग्य नसून कॅसिनो, बोट चालक, ऑटोमोबाईल इंडस्ट्री यांना सुट्ट्या पेट्रोलची गरज लागते. मात्र असे पेट्रोल देणे बंद करण्यात आल्याने ग्राहकांच्या रोषास पेट्रोलपंप चालकांना सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात संघटना लवकरच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

Leave a Comment