बिहार दिनाचे अर्थकारण

    बिहार दिनाचे राजकारण तर गाजले, पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या राजकारणाचे रूपांतर अर्थकारणात करून या राजकारणाला मोठीच चातुर्यपूर्ण कलाटणी दिली. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरुवातीला मोठ्या घोषणा केल्या खर्‍या, परंतु बिहार दिनाचा युक्तिवाद एवढा समर्थ होता की, मनसेच्या राजकारणाला काही थाराच राहिला नाही. माणसाचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुण त्याच्या बोलण्या वागण्यातून आणि कठीण समयातील निर्णय घेण्याच्या क्षमतेतून व्यक्त होत असतात. बिहार दिनाच्या या प्रसंगात या दोन्हीबाबतीत मुख्यमंत्री नितीशकुमार हे राज ठाकरे यांच्यापेक्षा किती तरी श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट झाले. राज ठाकरे हे मालेगावच्या सभेत बोलायला उभे राहिले असतानाच त्यांना बिहार दिनाच्या या कार्यक्रमाची बातमी मिळाली आणि तिचा फारसा विचार न करता त्यांनी या बातमीवरची आपली, संकुचित प्रादेशिक भावना व्यक्त करणारी प्रतिक्रीया अविचारानेच व्यक्त केली. महाराष्ट्रात यायचे असेल तर आमची परवानगी घ्यावीच लागेल, असे आततायीपणाचे प्रतिपादन त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये करून टाळ्या मिळविल्या.
    वक्ता जर आततायी असेल, तर त्याचे श्रोतेही तसेच असतात. म्हणून राज ठाकरे यांनी आपल्या व्हिसाची वल्गना करताच उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी सुद्धा तिला टाळ्यांनी प्रतिसाद दिला. नितीशकुमार हे मात्र शांत राहिले. त्यांनी जशास तसे उत्तर देण्याचे टाळले आणि आपल्या स्वभावातला गंभीरपणा कायम ठेवून त्यांनी परिस्थिती हाताळली. आचार्य विनोबा भावे ’जशास तसे’ या उक्तीवर फार छान भाष्य करत असत. तलवारीला तलवारीने उत्तर देणे म्हणजे जशास तसे, असे समजले जाते. परंतु तलवारीला उत्तर देण्यासाठी तलवार वापरून चालत नाही, तर ढाल वापरावी लागते. तरच तलवारीचा वार आणि त्याची तीव‘ता बोथट होत असते. विनोबांच्या या प्रतिपादनाचा प्रत्यय या बिहार दिनाच्या राजकारणामध्ये आला. राज ठाकरे यांच्या वल्गनांना वल्गनेने उत्तर देण्याऐवजी शांतपणाने उत्तर देऊन नितीशकुमार यांनी त्यांच्या वल्गना बोथट करून टाकल्या. नितीशकुमार यांच्या विषयी महाराष्ट्रात एक उत्सुकता आहे. जंगलराज म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिहारला प्रगतीच्या मार्गावर आणणारा एक नेता म्हणून त्यांना सारे लोक ओळखतात. त्यांनी बिहार दिनाच्या समारंभात आपल्या वर्तनाने एक वेगळी ओळख महाराष्ट्राला करून दिली.
    राज ठाकरे आणि मनसे हे बिहारी लोकांच्या विषयी मराठी लोकांच्या मनात किल्मिष निर्माण करून आपला स्वार्थ साधत असतात आणि त्यासाठी त्यांना महाराष्ट्रामध्ये सातत्याने बिहारीविरुद्ध मराठी असा संघर्ष पेटवत ठेवावा लागतो. परंतु नितीशकुमार यांनी मात्र आपल्या वर्तनाने आणि बोलण्याने बिहार आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये कोठे वैराची भावना असावी किंवा असली पाहिजे असे दिसू दिले नाही. या संबंधात ते जपून बोलले. महाराष्ट्रात बिहार दिन साजरा होत असला तरी त्यामागे मराठी माणसाला खिजविण्याची भावना आहे असे त्यांनी चुकूनही दिसू दिले नाही. बिहार दिनाच्या कार्यक‘माची सुरुवात त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर महाराष्ट्र गीत म्हणायला लावले. `जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्या आणि आपल्या भाषणातली पहिली काही वाक्ये ते मराठीतून बोलले. या सार्‍या कृतीतून त्यांनी महाराष्ट्रा विषयीची कृतज्ञता आणि बंधूभाव व्यक्त केला. बिहारी माणूस हा कोणावरही ओझे होऊन रहात नाही, उलट जिथे जाईल तिथले ओझे उचलण्याचा प्रयत्न करत असतो, असे सूचक उद्गार त्यांनी काढले आणि कोणत्याही नव्या वादाला जन्म न देता मनसेच्या दुष्ट प्रचाराला चोख आणि उचित असे उत्तर दिले.
    त्यांनी आपल्या या दौर्‍यातून आपली सुसंस्कृत राजकारणी ही प्रतिमा निर्माण केली. बिहारचा विकास हा त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आणि बिहार यांचे संबंध तसेच बिहारचा विकास आणि बिहारी माणसाची रोजगार निर्मिती हाच असावा हे साहजिक होते. महाराष्ट्रामध्ये बिहारी लोकांना रोजगार मिळतो हे त्यांनी मान्यच केले. परंतु अन्य हिंदी भाषिक नेत्यांप्रमाणे मुंबईतले बिहारी लोक रजेवर गेले तर मुंबई शहर ठप्प होऊन जाईल, अशा प्रकारची दर्पोक्ती करण्याचा वावदूकपणा त्यांनी टाळला. शेवटी ते मु‘यमंत्री आहेत. आगलावू विधाने करणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणे, असे सस्ते राजकारण करण्याची त्यांना गरज नाही. विधायक राजकारण करत आपण सत्तेत येऊ शकतो आणि सत्तेवर येऊन राज्याचा विकासही करू शकतो, असा आत्मविश्‍वास त्यांना आहे. त्यातूनच त्यांनी मुंबईत येऊन वावदूकपणा करण्याच्या ऐवजी मराठी गुंतवणूकदारांनी बिहारमध्ये येऊन गुंतवणूक करावी आणि बिहारच्या माणसाला तिथेच रोजगार द्यावा, असे मार्मिक आवाहन केले. मराठी माणूस रोजगारासाठी बिहारी माणसाशी भांडत आहे अशी मराठी माणसाची प्रतिमा राज ठाकरे यांनी उभी करत आणलेली आहे, पण नितीशकुमार यांनी मराठी माणसाला रोजगार निर्मिती करणारा गुंतवणूकदार असा मान देऊन आपल्या मनाचा उमदेपणा दाखवून दिला.

Leave a Comment