नव्या मुंबईतल्या सहा मुली घरातून पळाल्या. सगळ्या मुली साधारणतः १२ ते १३ वर्षांच्या. मुली पळून जाण्याचे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत. एक तर अशा मुली वयात येत असतात. मुलांविषयी आकर्षण वाटत असते. आजूबाजूचे सारे वातावरण लैंगिक भावनांना केवळ खतपाणीच घालणारे नव्हे तर त्या भावना शक्य तेवढ्या भडकवणारे. त्यामुळे कोणा तरी मुलाने फूस लावून, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे. दुसरा प्रकार म्हणजे सिनेमात हिरॉईन होण्याचे आकर्षण.
या दोन कारणांनी पौगंडावस्थेतल्या मुली आणि मुले पळून जात असतात. पण या मुली तशा पळाल्या नव्हत्या. त्यांनी जाताना आपल्या पळून जाण्याच्या कारणांची चर्चा केलेली होती. आपण नाव काढायला जात आहोत, आपला शोध घेऊ नये आणि काळजी करू नये असे त्यात म्हटले हते. नाव काढले किवा प्रगतीच्या शिखरावर पोचल्या की त्या मुली आपोआप परत येणार होत्या. असे असले तरीही या मुलींच्या बापांनी पोलिसांत धाव घेतली आणि नव्या मुंबईतल्या या मुली मुंबईत सापडल्या. त्यांना पोलिसनी घरी आणून सोडले. त्यांच्या जबान्या घेतल्या. येथेच हे प्रकरण संपले.
या मुलींनी आपल्या जबान्यांत काय म्हटले होते हे कोणालाच माहिती नाही. जे काही म्हटले आहे ते लोकांना कळले पाहिजे असे पोलिसांनाही वाटले नाही आणि माध्यमांनाही त्याचे महत्त्व जाणवले नाही. कारण या जबानीत काही सनसनाटी नाही. तसा विचार केला आणि समाजशास्त्रज्ञांच्या नजरेतून पाहिले तर मात्र या मुलीच्या जबान्या फारच खळबळजनक आहेत.
या मुली प्रेमप्रकरणातून पळाल्या नव्हत्या आणि सिनेमान हिरॉईन होण्यासाठीही घरातून गेलेल्या नव्हत्या. त्यांना घरातून जाच होत होता. जाच म्हणजे भांडी घासणे, धुणे धुवणे, असली कामे लावणे किवा खायला न देता उपाशी ठेवणे असे काही प्रकार होत नव्हते.त्यांचे पालक त्यांना शाळेतल्या अभ्यासात भरपूर मार्क मिळत नाहीत म्हणून सारखे बोलत होते आणि भरपूर मार्क मिळवून त्यांनी डॉक्टर किवा इंजिनियर व्हावे असा तगादा लावत होते.
मुलींच्या आपल्या आयुष्याच्या कल्पना यापेक्षा वेगळ्या होत्या. त्याही महत्त्वाकांक्षी होत्या. पण त्यांच्या पालकांच्या डोक्यात चांगले काही तरी होणे म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर होणे या पलीकडे काही नव्हते. आपल्या या अर्धवट कल्पनेत ते आपल्या मुलींना बांधून ठेवत होते आणि त्यासाठी अभ्यासात भरपूर मार्क मिळवले पाहिजेत असा दबाव आणत होते. हा त्यांना जाच होता. त्यातून सुटका करून घेण्यासाठी या मुली घराच्या बाहेर पडल्या होत्या.
त्या मुलींना आपले भवितव्य आपल्या मनाप्रमाणे घडवायचे होते. या मुलींची यात काही चूक नाही आणि पालकांचीही काही चूक नाही. त्यांचीही आपल्या मुलींविषयी चांगलीच भावना होती. पण त्यांच्या त्या कल्पना चुकीच्या माहितीवर आधारलेल्या होत्या. मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवले पाहिजेत हे तर खरेच आहे. पण मार्क मिळवण्याच्या बाबतीत काही मर्यादा असतात. प्रत्येकालाच ९० टक्के मार्क मिळू शकत नाहीत. काही मुलांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्याची मजल ६० टक्क्यांपर्यंत असते. अशा मुलाला ६५ ते ७० टक्के मार्क मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तेही जाच न करता. पण त्याची लिमिट आहे ६० टक्क्यांची आणि त्याच्याकडून अपेक्षा केली जातेय ९० टक्के मार्कांची.
अशा पालकांना आपण आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करीत आहेत असे वाटत असते पण प्रत्यक्षात ते आपल्या मुलाचे नुकसानच करीत असतात. ही अपेक्षा जेव्हा हट्टाग्रहात बदलते तेव्हा मुले घरातून पळून जातात किवा ते शक्य झाले नाही तर आत्महत्या करतात. कालच मुंबईत एक मुलगी एका मंदिरासमोर भीक मागताना सापडली. चांगल्या घरची मुलगी अशी भीक का मागत आहे म्हणून चौकशी केली तेव्हा तिच्या वडलांनी मार्क कमी मिळाले म्हणून तिला दिलेली ती शिक्षा होती असे समजले.
मुलाचे आई वडील होणे सोपे आहे पण पालक आणि मार्गदर्शक होणे फार अवघड आहे. पालक होणे हे जबाबदारीचे आणि ज्ञान मिळवून करायचे काम आहे. मुलाला अभ्यासात भरपूर मार्क मिळाले म्हणजेच सारे काही भरून पावलो असे मानणारे हे पालक आपला मुलगा किवा मुलगी व्यायाम किती करतेय याची काळजी कधी करताना दिसत नाहीत. तो कोणते खेळ खेळतो, त्याचे मित्र किवा मैत्रिणी कोण आहेत याची तर ते कधी चौकशीच करीत नाहीत.
पालकत्वात या गोष्टी येत नाहीत का ? इंजिनियर किवा डॉक्टर होणे यातच जीवनाचे सार्थक आहे का ? आपल्या देशाला, इतिहासाला वळण लावणारी मोठी कामे करणारे नेते आणि कलाकार काय केवळ इंजिनियरच होते का ? इंजिनियर होण्याने प्रतिष्ठा मिळते असे मान्य केले तरीही केवळ तेवढ्यासाठी ती गोष्ट त्या मुलावर त्याच्या मनाच्या विरोधात लादण्यात काय अर्थ आहे ? त्याला इंजिनियर होण्याची इच्छा नसताना आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून त्याच्यावर आत्महत्या करावीशी वाटेपर्यंत आपल्या अपेक्षांचे ओझे टाकणे हे काही संयुक्तिक नाही. मुले स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांची असतात. ती आपल्या अपुर्या आकांक्षांचे हमाल नसतात.
Dear Sir,
My son is in 12th standard cbsc pattern.All tutions and school admission has done as per his wish but now adays he is not concentration on his studies. Pl guide us.
Regards,
Rajesh