
पुणे, दि. २० : अफलातून गाजलेल्या नवा गडी नवे राज्य या नाटकाचे चित्रपटात रुपांतर करण्यासाठी पुण्यातील जाहिरात आणि सराफ व्यवसायातील
दिग्गज एकत्र आले आहेत. उमेश कामत, प्रिया बापट आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातच सुरु
झाले असून, २४ कॅरट ए टर टेन मेंट आणि प्रतिसाद प्रोडक्शन हे संयुक्तपणे हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे अभिजित जोग आणि सौरभ गाडगीळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
`नवा गडी नवे राज्य’ या नाटकाचे ३०० प्रयोग झालेले असून त्याच्या टिकून राहिलेल्या विषयाच्या ताजेपणाचा फायदा घेऊन हा चित्रपट तयार केला जाणार आहे. दिवाळीच्या सुमारास चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यात वंदना गुप्ते यांचीही भूमिका असेल. दोन कोटी रुपये खर्चून हा चित्रपट तयार करण्यात येत असून फेसबुकवर `नवा गडी नवे राज्य’ या नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहून ही कल्पना सुचल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. `२४ कॅरट ए टर टेन मेंट’ या कंपनीची स्थापना दाजीकाका गाडगीळ डेवलपर्स आणि केदार वान्जपे यांनी केली आहे तर प्रतिसाद प्रोडक्शन ही नवी कंपनी प्रतिसाद कम्युनिकेशनची सहयोगी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन करमणूक उद्योगात उतरत आहेत. याआधी या कंपनीने गाजलेल्या नटसम्राट आणि बारीस्तरच्या सीडी बाजारात आणल्या आहेत.
करमणूक क्षेत्रातील कंटेंटची बाजारपेठ काही हजार कोटी रुपयांची आहे अशी माहिती देऊन सौरभ गाडगीळ म्हणाले कि यासाठी टूल बॉक्स हि कंपनी आम्ही विकत घेतली असून तिचे बाजार मूल्य पाच कोटी रुपये आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील दोन कंपन्यांनी एकत्र येऊन मराठी चित्रपट निर्मिती करण्याचा हा पहिलाच प्रयोग असेल असा दावा त्यांनी केला. यापुढील काळात टीवी मालिकेसह जाहिरात आणि करमणूक उद्योगाला लागणार या सर्व सेवा या कंपनीतर्फे देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.