सचिनच्या ’महाशतकी’ कामगिरीमुळे देशाचे नाव संपूर्ण विश्वात उंचावले – मुख्यमंत्री

मुंबई, दि. १६: महाराष्ट्राच्या मातीतील एका खेळाडूने तब्बल २२ वर्षे जगभरातील क्रीडा विश्वावर अधिराज्य गाजवीत शुक्रवारी आपल्या महाशतकी कामगिरीने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव संपूर्ण विश्वात उंचावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकावर प्रतिक्रीया दिली आहे.
जगातील जवळजवळ सर्वच मैदानावर आपल्या सर्वोत्तम आणि परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन करणार्‍या तेंडुलकरने कसोटी आणि एक दिवसीय या दोन्ही प्रकारात जगात प्रथम क्रमांकावर आहे. दोन्ही प्रकारात सर्वाधिक शतके, सर्वाधिक अर्धशतके आणि विश्वचषक स्पर्धांचा विचार करता एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार आणि सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार, तसेच एक दिवसीय सामन्यात कॅलेंडर वर्षात एक हजारपेक्षा जास्त धावा काढण्याची सर्वाधिक वेळा केलेल्या कामगिरीमुळे त्याने भारताबरोबर महाराष्ट्राचेही नाव उज्वल केले आहे, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले.
भारतरत्न द्या – आशा भोसले
सचिनच्या महाशतकामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी दुबईत शूटिंगसाठी आले असून मला बातमी समजल्यानंतर खूप आनंद झाला. त्याचे शतक मला पाहता आले नाही. परंतु त्याच्या या महाशतकामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. त्याने खरोखरच आज इतिहास घडविला आहे. खर तर त्याला भारत सरकारने आता तरी ‘भारतरत्न’ देऊन गौरविले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली.
सचिन म्हणजे ईश्वराची खास देणगी – अमिताभ बच्चन
सचिन म्हणजे ईश्वराने भारताला दिलेली खास देणगी आहे. असा विश्वविक्रम भूतकाळातही कोणी केला नाही आणि तो भविष्यातही कोणी करील असे वाटत नाही, असे बीग बी अमिताभ बच्चनने ट्वीटरवर म्हटले आहे.
सचिनने आनंदातच शतक साजरे केले – अंजली तेंडुलकर
सर्वांनी आनंदातच खेळ खेळावा असे मत असलेल्या सचिनने आनंदातच शंभरावे महाशतक पूर्ण केले असून यापुढेही तो असाच तडाखेबाज खेळ करील असा विश्वास त्याची धर्मपत्नी अजंली तेंडुलकर हिने व्यक्त केला आहे.
शतकाबद्दल मला विश्वास होताच – रमाकांत आचरेकर
सचिन आज शंभरावे शतक करुन विश्वविक्रम करील असा मला पूर्ण विश्वास होता, अशी प्रतिक्रिया सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी व्यक्त केली. सचिनच्या या विक्रमानंतर आचरेकर सरांनी सर्वांनी चॉकलेट वाटून आपला आनंद व्यक्त केला.

Leave a Comment