पाणी जिरवणे हाच उपाय

महाराष्ट्रामध्ये यंदा दुष्काळाची हाकाटी होत आहे. परंतु महाराष्ट्रालाच दुष्काळाचे हे संकट का जाणवत आहे याचा विचार आपण कधी केला आहे का? या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नुकतीच केंद्र सरकारची तज्ज्ञांची तुकडी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना भेट देऊन गेली. वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या या संकटाची पाहणी त्यांनी काही मिनिटात केली आणि महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी किती कोटी रुपये केंद्राकडून मिळावेत यावर चर्चा करून त्याच्या शिफारसी सोबत घेऊन हे पथक दिल्लीला रवाना झाले. दुष्काळाची जखम फार मोठी आहे आणि ती खोलवर पोचलेली आहे. परंतु सरकार दरवर्षी त्या जखमेवर वरवरची मलमपट्टी करत राहते. ही जखम कायमची दुरुस्त करावी याबाबत सरकारी पातळीवर कोणीही प्रयत्न करत नाही आणि राजकीय स्तरावर तर तसा कोणी विचारसुद्धा करत नाही. त्यामुळे दरवर्षी मलमपट्टीवर हजारो कोटी रुपये खर्च होतात. खरे म्हणजे दुष्काळ हा निसर्गाने निर्माण केलेला नसतो, तो मानवाने निर्माण केलेला असतो.

सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडला म्हणून दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे. परंतु पाऊस कमी पडणे हा जर दुष्काळ असेल तर इस्रायलमध्ये महाराष्ट्राच्या पावसाच्या निम्म्याएवढा सुद्धा पाऊस पडत नाही, पण तिथे कधीच दुष्काळ पडलेला नसतो. मग पाऊस कमी पडणे म्हणजे दुष्काळ ही आपली मीमांसा कधीतरी बदलण्याची गरज निर्माण होते. आपण ज्याला दुष्काळ म्हणतो तो शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास दुष्काळ नसतो तर ती असते अनावृष्टी. अनावृष्टी म्हणजे कमी पाऊस पडणे. कमी पाऊस पडला म्हणजे दुष्काळ पडलाच पाहिजे असे काही नाही. निसर्गात कमी पाऊस पडतो आणि त्यामुळे आपल्या मनात दुष्काळ निर्माण होतो. परंतु पाऊस कमी पडला तरीसुद्धा शेती व्यवसायाचे व्यवस्थापन कौशल्याने केले तर या अनावृष्टीतून सुद्धा मनामध्ये सुकाळ निर्माण करता येतो. तेव्हा दुष्काळ-सुकाळ या मनाच्या भावना आहेत. तेव्हा मनाचा हिय्या करून दुष्काळावर मात करायचा प्रयत्न केला तर दुष्काळ आपल्या जीवनातून हद्दपार होऊ शकतो. पण तसा तो करण्याऐवजी दुष्काळावर नेहमीच वरवरची मलमपट्टी केली जाते. शासकीय पातळीवर किंवा राजकीय पातळीवर कोठे तरी दुष्काळाचे कायमचे उच्चाटन करण्याचा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या मलमपट्टीवरचा खर्च चालूच राहणार आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पाऊस हा कमी-जास्त पडत राहणारच आहे. मात्र तो कमी-जास्त पडला म्हणून आपण सतत दुष्काळ दुष्काळ म्हणून ओरडत जगत राहणार आहोत का, असा प्रश्‍न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. मलमपट्टी सुरू असतानाच खोलवर पोचलेल्या जखमांवर कायमचा इलाज करण्याचे उपायही सुरू राहिले पाहिजेत, तरच दुष्काळ कायमचा संपेल. महाराष्ट्र शासनातर्फे सध्या विविध जिल्हा परिषदांच्या मार्फत विहीर पुनर्भरण मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम म्हणजे दुष्काळावरचा कायमचा उपाय आहे. कारण वारंवार पडणारा दुष्काळ हा भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे जाणवत आहे. ही पाण्याची पातळी उंचावली, तर दुष्काळ निवारणाकडे कायमचे पाऊल पडणार आहे. दरसाल पडणारा पाऊस जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवत असतो. परंतु पातळी वाढविण्याच्या वेगापेक्षा जमिनीतले पाणी उपसण्याचा वेग मोठा आहे. त्यामुळे दरसाल एक फूट पाणी वाढते आणि आपण दोन फूट पाणी उपसून घेतो. परिणामी एक फुटाची घट होते. त्यामुळे आपण दरवर्षी जेवढे पाणी उपसतो त्यापेक्षा अधिक पाणी पावसाळ्यामध्ये जमिनीत मुरवले पाहिजे आणि तसे झाले तरच जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढणार आहे. प्रत्येक जण ट्युबवेल खोदून आणि त्यावर मोटारी बसवून पाणी खेचत आहे, पण तेवढेच पाणी जिरवण्याची दक्षता घेत नाही.

म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे सुरू असलेल्या जलपुनर्भरणाच्या प्रयोगाला महत्व आहे. त्यामध्ये पाणी भरपूर जिरवले जाणार आहे. आपल्या सुदैवाने आपल्याला जिरवण्यासाठी भरपूर पाणीसुद्धा उपलब्ध आहे. फक्त आपण ते जिरवण्याची काळजी करत नाही. ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे ही गोष्ट फार चांगली आहे. दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे नेमके काय, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. पण असा प्रयत्न म्हणजे अधिकात अधिक पाणी जिरवणे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी या गावात हाच प्रयोग यशस्वी केलेला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली आहे. म्हणून एखादे वर्षी पाऊस पडला नाही तर लगेच शेतकरी उघडा पडत नाही. जमिनीच्या आतले पाणी वर आलेले असते, ते त्याला दुष्काळी वर्षात पुरते. तेव्हा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देण्याची गरज आहे. शेवटी आपला दुष्काळ सरकार हटवेल असे म्हणून सरकारच्या तोंडाकडे पाहण्यात काही अर्थ नाही. सरकारी योजनांचा फायदा घेऊन किंवा सामाजिक उपक्रम राबवून आपला दुष्काळ आपणच हटवला पाहिजे.

Leave a Comment