
मुंबई, दि. २० – अर्थसंकल्पामध्ये उत्पादन शुल्कामध्ये करण्यात आलेली वाढ तसेच ऊर्जा बचतीच्या नवीन नियमावलीने देशातील एअर कंडिशनर उत्पादित करणार्या कंपन्यांच्या वाढलेल्या अडचणी यामुळे ऐन उन्हाळ्यात `एसी’च्या किंमती वाढल्या आहेत. उत्पादन शुल्कातील वाढीमुळे एसीच्या उत्पादनासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांना एसीच्या किंमतींमध्ये वाढ करावी लागली असून याचा परिणाम विक्रीवर होणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात बाजारात एअर कंडिशनरच्या मागणीत मोठी वाढ होत असते. एसी उत्पादक कंपन्यांसाठी उन्हाळा विक्रीच्या दृष्टीने महत्वाचा असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये डॉलरच्या तुलनेत रूपयांमध्ये झालेल्या अवमूल्यनाचा फटका या कंपन्यांना बसला आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात सरकारने उत्पादन खर्चामध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ केली असल्याचे औद्योगिक संघटनेने म्हटले आहे.
एसीसाठी सरकारने नवीन ऊर्जा बचत नियमावली लागू केली आहे. या नियमानुसार एसीला लागणारे सुटे भाग व तंत्रज्ञान सध्या एसीपेक्षा महागडे असल्याचे उत्पादनाचा खर्च २० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. खर्चाचा भार कमी करण्यासाठी काही कंपन्यांनी एसीच्या किंमती २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढविल्या आहे.
गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांना नवीन एसीसाठी ३ हजार ते ७ हजार रूपयांचा जादा भार सोसावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन एसी खरेदीचा विचार पुढे ढकलला जावू शकतो, असेही ‘असोचे’मने म्हटले आहे. त्यामुळे यंदा एसीची विक्री २५ टक्क्यांपर्यंत घटेल असा असोचेमचा अंदाज आहे. एसी उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळे त्याचा परिणाम मागणीवर होईल, अशी भीती एसी उत्पादक कंपन्यांना आहे.
