प्राधिकरणाचे ४९ कोटी रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

पिंपरी, दि. २० – गतवर्षीच्या प्रकल्पावरील तरतूदीमध्ये वाढ करून, प्राधिकरण बझार वगळता कोणताही नवा प्रकल्प हाती न घेता फक्त ४८ कोटी ८७ लाख रूपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक शुक्रवारी प्राधिकरणाच्या सभेत मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख होते. प्राधिकरणाचे अंदाजपत्रक म्हणजे ‘जुन्या बाटलीत नवी दारू’ असे असून अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घरे देण्याचा जुना संकल्प पूर्ण करण्याचे आश्‍वासन यामध्ये पुन्हा देण्यात आले आहे.
    पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सन २०१२-१३चे अंदाजपत्रक तब्बल दोन महिने उशिराने मंजूर करण्यात आले. प्राधिकरणाच्या सभागृहात शुक्रवारी प्राधिकरणाची अंदाजपत्रकीय सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर देशमुख होते. तर या सभेला जिल्हाधिकारी विकास देशमुख, नगररचना उपसंचालक अविनाश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
    यंदाचे अंदाजपत्रक ५९४ कोटी ९ लाख रूपयाचे असून त्यात ५४५ कोटी २१ लाख रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हे अंदाजपत्रक ४८ कोटी ८७ लाख रूपयाचे शिलकी रकमेचे आहे. प्राधिकरणाच्या ठेवीही सव्वाशे कोटी रूपयाने कमी झाल्या असून यंदा प्राधिकरणाच्या ठेवी ३७५ कोटी १७ लाख रूपयाच्या दाखविण्यात आल्या आहेत. खर्चामध्ये वाढ सुचविणारा पण कोणताही नवा प्रकल्प हाती न घेता मंजूर करण्यात आलेल्या अंदाजपत्रक निर्जीव असल्याचे दिसून येते. प्रकल्पाच्या तरतूदीमध्ये वाढ केल्यामुळे जुने प्रकल्प गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा या अंदाजपत्रकात स्पष्ट दिसून येत असली तरी इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटरबाबत कोणतेही ठोस पाऊल या अंदाजपत्रकात उचलल्याचे दिसून येत नाही.
    अंदाजपत्रकात गतवर्षी सेक्टर ३० वाल्हेकरवाडी येथे गृहयोजना राबविण्यासाठी ५ कोटीची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी ३३ कोटी रूपयांची जादाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वादात सापडलेल्या सेक्टर १२ मध्येही स्वस्तात गृहयोजना राबविण्यासाठी ५१ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ६ हजार सदनिकांच्या या प्रकल्पासाठी ग्लोबल एमएसआय मिळवून सदनिकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. प्राधिकरण क्षेत्रामध्ये क्रीडांगणे, बगीचे व विरूंगळा केंद्र विकसित करण्यासाठीच्या तरतूदीमध्येही वाढ करण्यात आली असून २४ कोटी ४० लाख रूपयांच्या रक्कमेची भरीव वाढ करण्यात आली आहे. तसेच प्राधिकरण क्षेत्रात महिला व पुरूषांकरिता स्वच्छतागृहासाठी अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच विविध पेठांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी ५ कोटी ४० लाख रूपयाची तरतूद करण्यात आली आहे.
    पेठ क्रमांक २४ मधील जुने मॉडेल हाऊन पाडून नवीन रहिवासी इमारत बांधण्यासाठी १ कोटी, विविध पेठांमधील भूखंडासाठी मेन्सिंग सिमाभिंत बांधणे व नोटीस बोर्ड लावण्यासाठी १५ कोटी रूपये, हॉकर्स झोन निमिर्ती करण्यासाठी दीड कोटी, मटण व फिशमार्केट बांधण्यासाठी १ कोटी आणि भाजी मंडई बांधण्यासाठी २ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सेक्टर क्रमांक २४ मध्ये व्यापारी भूखंडामध्ये विकास कामे करून व्यापारी केंद्र निर्माण करण्यासाठी ३६ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. पेठ क‘मांक ७ व १० मध्ये मॅसिलिटी सेंटर उभा करण्यासाठी १४ कोटी ४३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यातील तुळशीबागेच्या धर्तीवर प्राधिकरण हट आणि हॉकर्स झोन निर्माण करण्यात येणार आहे.

Leave a Comment