स्वीकृत सदस्यांना बसणार नव्या जी.आर.चा फटका ?

ठाणे, दि. १९ – शुक्रवारी होणा-या पालिका सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या आलेल्या २८ अर्जांपैकी पक्षाच्या संख्याबळानुसार सदस्यांची निवड होणार आहे. मात्र, या निवडीत नव्या सरकारच्या अध्यादेशाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. तर नंदलाल समितीत दोषी असलेला सदस्य स्वीकृत सदस्य होण्यास अपात्र ठरण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
    शुक्रवारी पाच स्वीकृत सदस्यांची निवड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार असून यासाठी आलेल्या २८ अर्जांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. पाच स्वीकृत सदस्यांपैकी शिवसेनेचे दोन तर लोकशाही आघाडीचे तीन सदस्यांची निवड होणार आहे. शासनाच्या जी.आर. नुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. शासनाच्या जी.आर.नुसार स्वीकृत सदस्य उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठीत असायला हवेत. शासनाच्या या निकषाने सर्वपक्षीय ज्येष्ठ पराभूत उमेदवार अथवा ज्येष्ठ पदाधिका-यांवर मात्र गंडातर आले आहे. तर  दुसरीकडे स्वीकृत सदस्याच्या निवडीत नंदलाल समितीतील दोषी सदस्यांचा सहभाग नसावा, असे दयानंद नेवे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. यावर पालिका सचिव व आयुक्त यांच्या औपचारिक चर्चेत स्वीकृत सदस्यांत नंदलाल समितीतील दोषींचा सहभाग नसावा असा निर्णय झाल्याचे समजते. मात्र, हा अधिकार कायद्यान्वये पालिका आयुक्तांना असला तरीही यावर महासभेत निर्णय अंतिम राहणार आहे. स्वीकृत सदस्यांची निवड सर्वपक्षीय असल्याने महासभेत हा निर्णय होईल यावर प्रश्‍नचिन्ह आहे, तर दुसरीकडे  माजी आमदार सुभाष भोईर, अशोक राऊळ आणि सनी थॉमस यांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आल्याचे समजते. या सर्व पार्श्‍वभूमीवर शुक्रवारच्या महासभेत स्वीकृत सदस्य निवडीसंदर्भात काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment