
पुणे, दि. १८ – भविष्यातील वीजेची गरज भागवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणार्या सर्वच ऊर्जा स्त्रोतांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आवश्यक ठरणार आहे, असे मत माजी राजदूत डॉ. शीलकांत शर्मा यांनी व्यक्त केले. वीजेच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकणार्या अणुऊर्जा प्रकल्पांना होणारा विरोध हा देशाच्या भविष्यकालीन प्रगतीलाच विरोध ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर मुळे एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘झेप प्रकाशाकडे’ व्याख्यानमालेंतर्गत ‘भारतासाठी शाश्वत ऊर्जा : आव्हाने आणि उपाय’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे महासंचालक अनंत सरदेशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. शर्मा म्हणाले, ‘देशाची ऊजेची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे; पण त्या तुलनेत निमिर्ती होताना दिसत नाही. त्यामुळेच आता ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत तूट भरून काढण्यासाठी पारंपरिक आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या एकत्रित वापराकडे आपण लक्ष द्यायला हवे. नव्याने उभारण्यात येणार्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये पुरेशा सुरक्षाविषयक तरतुदींनंतरच आपल्याकडे त्यांना परवानगी देण्यात येत आहे.
