`कॅग’ वरून रंगले राजकारण

मुंबई, दि. १८ – राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कॅगचा अहवाल सभागृहात सादर होण्याआधी त्यातील तपशील फुटल्यामुळे विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राणे यांनी भाजपाचे धडाडीचे आमदार देवेंद्र फडणवीस, आयबीएन लोकमत, स्टार माझा या वृत्तवाहिन्या, दैनिक सामनाचे विश्‍वस्त, मालक, संपादक बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारी संपादक खा. संजय राऊत तसेच दै. लोकसत्ताच्या विशेष प्रतिनिधींना हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
    विधानसभेत ४ एप्रिल रोजी फडणवीस यांनी सीडीच्या माध्यमातून कॅगच्या अहवालात नमूद केलेल्या जमीन घोटाळयावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांना लक्ष्य केले होते. कॅगच्या अहवालात प्रामुख्याने उद्योगमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, रोजगार मंत्री नितीन राऊत, कृष्णा खोरे विकास मंत्री रामराजे निंबाळकर, वनमंत्री पतंगराव कदम, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, विद्यमान विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके व केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारचे भूखंड नियमबाह्य रितीने माफक किंमतीत मिळविले असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा अहवाल नेमका अधिवेशनाच्या मुख्य टप्प्यातच फुटल्यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले आणि विरोधकांनीही त्याचा पुरेपूर वापर केला.
    माजी मुख्यमंत्री व कोकणचे वजनदार नेते नारायण राणे यांनी कॅगच्या अहवालाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर कॅगसारख्या घटनात्मक संस्थेच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यातच बुधवारी विधानसभेत राणे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यातील तपशील जाहीर करणे हा सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचा दावा राणे यांनी आपल्या प्रस्तावात केला आहे. दरम्यान फडणवीस यांनीही राणे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्याची परवानगी सभागृह अध्यक्षांकडे मागितली असल्याचे समजते.  

Leave a Comment