आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयाला जप्तीची नोटीस

अमरावती, दि. १९ – लाखो रुपयांचा मालमत्ता कर काही वर्षांपासून थकीत असल्यामुळे बुधवारी महापालिका प्रशासनाने येथील विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला जप्तीची नोटीस दिली आहे. येत्या आठ दिवसांत या कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विभागीय आयुक्तालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला अशा स्वरूपाची नोटीस जारी करण्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
    महापालिकेचे उत्पन्न वाढावे, तसेच गेल्या काही वर्षांची मालमत्ता कराची थकबाकी मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त नवीन सोना यांनी थकबाकीदारांची यादी तयार करून धडक वसूली मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या लेखा विभागाने बुधवारपासून धडक मोहीमेला सुरुवात करून जप्ती नोटीस जारी केल्या आहेत. विभागीय आयुक्तालय, तसेच विभागीय आयुक्तांच्या निवासावर चार लाख रुपयांच्या मालमत्ता  कराची थकबाकी आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकार्‍यांच्या निवासावर सात लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने देखील मालमत्ताकराचे ८५ हजार रुपये भरलेले नाहीत. यासोबतच शहरातील काही शैक्षणिक संस्थावर सुद्धा नोटीस बजावण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment