सेसा गोवा अंतिम फेरीत

कोल्हापूर, दि.२४ – शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात गोव्याच्या सेसा फुटबॉल अॅकॅडमीने मुंबईच्या आरसीएफ संघावर २ -१ गोलने मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. सेसा संघाचा व्हेलेंटो क्रुझ उत्कृष्ठ खेळाडू ठरला. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ व कोल्हापूर युथ फौंडेशन आयोजित स्पार्कल ब्ल्यू रिज चषक स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामना आरसीएफ मुंबई आणि सेसा गोवा संघादरम्यान झाला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया झाल्या.
सेसाच्या प्रतेश शिरोडकरच्या पासवर चिकुडीने मारलेल्या फटक्यावर चेंडू बाहेर गेला. अॅडवीन सुक्रास याचीही संधी वाया गेली. आरसीएफच्या नॅनो युनमने सेंटरपासून जोरदार फटक्याद्वारे चेंडूला गोल जाळयाची दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला, पण गोलरक्षक टी रोशनसिगने टॉस करुन चेंडू बाहेर काढला. प्रविण शर्मा व प्रियकुमार यांचे चिकुडीने हेडद्वारा गोल नोंदवून ४३ व्या मिनिटास १ – ० ची आघडी घेतली. पुर्वार्धातील आघाडीमुळे उत्तरार्धात सेसा गोवाने वेगवान खेळ केला मात्र, त्यांच्या रक्षक नाईक, मार्गोस फर्नांडीस, अमोल साळगांवकर यांच्या संधी वाया गेल्या.
एका चढाईत रक्षक नाईकने मिळालेल्या संधीचा लाभ उठवत संघाचा दुसरा गोल ५७ व्या मिनिटास नोंदविला. आरसीएफच्या सुनिल भोसले, सनी सनगर, प्रविण जाधव यांना समन्वयाअभावी गोल करण्यात अपयश आले. अखेर प्रियकुमार शर्माने केलेल्या चढाईत लहान गोलक्षेत्रात मिळालेल्या चेंडूवर रॉकी फिलने याने गोल नोंदवून आघाडी २ -१ अशी केली. उर्वरित वेळेत २ -१ ची आघाडी कायम राखत सेसा गोवाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पूर्ण सामन्यात दोन्ही संघांना मिळालेल्या कॉर्नर किकचा लाभ उठवता आला नाही. पुणे डेक्कन वि. वेस्टर्न रेल्वे, मुंबई यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी अंतिम सामन्यात सेसा गोवा लढत देणार आहे.

Leave a Comment