
मुंबई, दि. १७ – पेण अर्बन को. ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. पेण या बँकेच्या ठेवीदारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आपल्या ठेवीची रक्कम परत मिळावी यासाठी आज आझाद मैदानात उर्त्स्फूत धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेऊन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एका आठवड्यात ठेवीदारांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बँकेच्या खातेदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष नरेश जाधव यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बँक लिक्विडेशनमध्ये जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले असतानाही आरबीआयने लिक्विडेशनची कारवाई सुरु केली. ही कारवाई त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली.
तसेच सरकारने बँकेत ७५० कोटी रुपयांच्या ठेवींचा अपहार करणार्या अध्यक्ष संचालक, अधिकार्यांची चौकशी करुन त्यांची मालमत्ता जप्त करुन व ती विकून त्यातून प्राप्त पैसे ठेवीदारांना वितरीत करावेत, कर्जदारांच्या ३०० कोटी रुपयांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन कर्जवसुली करणे व त्यातून ठेवीदारांची रक्कम देणे आदी मागण्या करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी सांगितले.
