
कोल्हापूर, दि. १६ – पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीस यापुढे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमु‘यमंत्री अजित पवार यांच्या समवेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पदाधिकारी वर्गासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिली.
येत्या ३ मे रोजी चित्रपट निर्मितीस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आगामी वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे तसेच शताब्दी आढावा डिझीटायझेशन तंत्रज्ञानाने घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले आहे. यासाठी शासकीय पदाधिकारी तसेच सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, राज्यमंत्री फजिया खान यांनीही विविध सूचना केल्या. त्यानंतर शताब्दी वर्षातील विविध कार्यक्रमांसाठी व्यापक समन्वय समिती नेमण्याचे तसेच मुंबईसह पुणे, कोल्हापूर आणि प्रत्येक महसूल विभागात कार्यक्रमाचे नियोजन करण्याचेही ठरविण्यात आले.
या व्यापक बैठकीस दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापक शाम तागडे, आशुतोष घेरवडे, स्वाती पाटील यांच्यासह कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापक संजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते विजय पाटकर, दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी शताब्दी वर्ष अविस्मरणीय व्हावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
