खेळाला आत्मविश्वासाची जोड देणे गरजेचे- अंजली भागवत

पुणे, दि. २८ -‘‘ देशातील प्रत्येक घरात विविध खेळांची आवड निर्माण होणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक खेळाडूने  खेळाला आत्मविश्वासाची जोड दिली तर ध्येयापर्यंत पोहचण्यास वेळ लागणार नाही.’’ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज अंजली भागवत यांनी केले.
 पुणे विद्यापीठाचा  वार्षिक क्रीडा  पारितोषिक  वितरण सोहळा अंजली भागवत व क्रिकेटपटू सुनील गदगे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.कार्यक्रमाच्या   अध्यक्षपदी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.संजय चहांदे होते. त्यावेळी भागवत बोलत होत्या. कार्यक्रमास  क्रीडा संचालक डॉ.दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष व्ही.बी.गायकवाड, प्रा.युवराज नरवडे, विविध महाविद्यालयातील शरिरिक शिक्षण विभागाचे संचालक  आदी उपस्थित होते.
भागवत यांनी सांगितले की, चीन ,अमेरिका  यासारख्या  देशांमध्ये  प्रत्येक नागरिकाला कुठल्या ना कुठल्या खेळाची आवड आहे. त्यामुळे भारताच्या तुलनेत या देशात अधिक खेळाडू निर्माण होतात. आपल्या देशातही अशी स्थिती निर्माण झाली तर भविष्यात भारत खेळांबाबत अव्वल स्थानी असेल.
आम्ही खेळामध्ये  कामगिरी  करण्यासाठी उतरलो तेव्हा अत्याधुनिक मैदाने,खेळाची साधने, तसेच क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध नव्हते. सध्या सर्व काही  उपलब्ध  आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच खेळांविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे .
विद्यापीठातर्फे आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विविध संघातील विजयी खेळाडूंचे कौतुक या समारंभात करण्यात आले.

Leave a Comment