स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मुंबई – आग्रा महामार्गावर रास्तारोको कांदा प्रश्‍नी निर्णय घेण्याची मागणी

नाशिक, दि. १७ –  कांदा उत्पादकांनी मांडलेल्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यास विलंब केला जात असल्याने मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मालेगावजवळ मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्तोरोको केला. शासनाकडून आश्‍वासन मिळाल्यानंतर सहा तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले. मालेगावजवहील टेहेरे येथे हे आंदोलन झाले.
    केंद्र सरकारने कांद्याला हमी भाव द्यावा, १ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीत कमी भावात विकलेल्या कांद्याची नुकसान भरपाई द्यावी, ऊसाप्रमाणे कांदा विकास निधी उपलब्ध करुन द्यावा, निर्यातदर शून्य करावा आणि कांदा निर्यातीसाठी मागणीनुसार रेल्वे वॅगन उपलब्ध करुन द्यावात या मागण्या संघटनेने शासनाकडे मांडल्या होत्या. गेल्या महिन्यात या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून कर्मचार्‍यांना डांबून ठेवले गेले. राज्य शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे संघटनेने काही दिवसांची मुदत दिली होती.
    आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने पोलीस यंत्रणेने पर्यायी मार्गाची व्यवस्था करुन दिली.

Leave a Comment