नक्षल्यांना शस्त्र पुरविणारे चौघे गजाआड

गडचिरोली, दि. १६ – नक्षल्यांना शस्त्रे पुरविण्यासाठी सौदा करताना छत्तीसगड पोलिसांनी चार जणांना रंगेहाथ पकडले. यातील दोघेजण गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे ठेकेदार असून, त्यापैकी एक आरोपी नागपूरचा आहे. तर अन्य दोघे छत्तीसगडचे आहेत. त्यांच्याकडून ४ लाख रुपये रोख, १ पिस्तुल, काडतुसे, मोटारसायकल, कार तसेच मोबाईल व चाकू जप्त करण्यात आला आहे. इरफान, मोहम्मद अहमद कुरेशी, तिलक गोयल व दीपक तालुकदार अशी आरोपींची नावे आहेत.
    रस्ते बांधकाम करणारे ठेकेदार नक्षल्यांसाठी शस्त्रखरेदीचा सौदा करणारे असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजनांदगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. संजीव शुक्ला यांच्या मार्गदर्शनात व नक्षल सेलचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक वाय. पी. सिंह यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक जी. सी. पती, सहायक उपनिरीक्षक आनंद शुक्ला, कन्हैया लाल, भानू वर्का, सतीश कुकार, अशोक वर्का, तेजान सिंह, राजेश सिंह, कार्तिक देशलहरे, संतोष साहू, ओंकार साहू, अनिलेश कुमार यांची चूक गठित करण्यात आली. रात्री सर्वांनी राजनांदगांव-कानपूर मार्गावर पाळत ठेवली. महाराष्ट्र राज्याची पासिंग असलेली एमएम ३१ बीसी/६६७८ क्रमाकांची पांढर्‍या रंगाची स्विफ्ट कार तसेच मोटारसायकलवर काही व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसून आले. पोलिसांनी कारमधील चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून नक्षली लेटरपॅड, कॅलक्युलेटरही जप्त केले.
    आम्ही नक्षलप्रभावित गडचिरोली व छत्तीसगडमध्ये अनेक वर्षापासून रस्ते निर्मिती व दुरुस्तीचे काम करीत असून नक्षल्यांना आवश्यक असणारे साहित्य पोहोचवितो, अशी कबुली इरफान व मोहम्मद अहमद कुरेशी यांनी दिली. रस्ते निर्मितीचे काम सुरू ठेवायचे असेल, तर आम्हाला शस्त्रे व काडतुसांचा पुरवठा करा, असे नक्षल्यांनी धमकावल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

Leave a Comment