यूजर चार्जेसची थकीत आकारणी सुरू, मिळकतदारांच्या मानगुटीवर नवा बोजा पैसा वसुलीचा मनपाचा फंडा

सोलापूर, दि.  १७  – ज्याचा वापरच होत नाही, तरीही आम्ही म्हणतो म्हणून यूजर चार्जेस, असा तुघलकी कारभार करणार्‍या महापालिकेने सोलापूरकरांच्या मानगुटीवर यूजर चार्जेसचे भूत बसविले आहे. गतवर्षी मनपा अंदाजपत्रकीय सभेत एकमताने ठराव करून या कराची आकारणी रद्द केली होती, पण मनपा प्रशासनाने गतवर्षीचा ठराव रद्द करून मलनिस्सारणावरील यूजर चार्जेसची थकबाकी आहे, असे गृहित धरून वसुलीचा फंडा सुरू करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. सोलापूरच्या हद्दवाढ भागात ना सफाई ना दिवाबत्ती, तसेच ना रस्ते ना पाणी, शिवाय ना आरोग्य ना स्वच्छता तरीही सोलापूर महापालिका येथील प्रामाणिक मिळकतदारांवर या सर्व करांची वसुली चालूच ठेवली आहे.
    तत्कालिन आयुक्त रणजीतसिंह देओल यांनी ड्रेनेज लाईनची कार्यवाही झाली असेल तरच यूजर चार्जेसची आकारणी होईल, असे मनपा सभेत स्पष्ट केले होते. पण नंतर आलेले आयुक्त सौरभ राव यांनी जुन्या आयुक्तांची सूचना धाब्यावर बसवून वसुली चालू ठेवली. दरम्यान गतवर्षी ३१ मार्च २०११ च्या मनपा सभेत एकमताने ठराव करण्यात आला, त्याप्रमाणे कार्यवाही झाली. मनपा निवडणुतकीत इच्छुकांना मात्र हा कर भरल्याशिवाय ना हरकत पत्र दिले नाही. आता निवडणुका संपताच मनपा प्रशासनाने गतवर्षी रद्द केलेल्या कराची आकारणी नव्या आर्थिक वर्षात थकबाकीसह वसुलीचा खटाटोप सुरू केला आहे. 

Leave a Comment