आपण प्रवासात असताना आपल्या आसनासमोर एखादे लहान बाळ असले की ते लगेच आपल्याकडे बघून हसायला लागते. आपण त्याला प्रतिसाद दिला की मग काय ? गट्टीच जमते आणि ते बाळ तासा दोन तासाच्या प्रवासातही आपल्याला लळा लावून जाते. लहान मुलांच्या मनात पाप नसते, आचपेच नसतो ते निष्पापपण त्यांच्या नजरेत दिसत असते.
अशा निष्पाप बाळाला ती मुलगी आहे म्हणून कोणता बाप तिच्या जन्मानंतर मारून टाकत असेल अशी कल्पना तर आपण करू शकतच नाही पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या बापाने हाताचा पाळणा करून त्या बाळाला जोजवले पाहिजे, तोच बाप त्याच्या मुळावर उठत असेल तर उलटे काळीज म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी अन्यत्र कोठेच जाण्याची गरज नाही. असा हा बाप निर्दयता आणि उलट्या काळजाचे जीते जागते उदाहरण आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
बंगलोरमध्ये केवळ अडीच महिन्याची एक मुलगी विलक्षण छळल्याने शरीराच्या चिंधड्या झाल्याच्या अवस्थेत दवाखान्यात दाखल झाली आणि उपचार न चालल्याने मरण पावली. तिच्या बापाला मुलगा हवा होता पण मुलगीच झाली म्हणून निराशावस्थेत त्याने आपल्या पत्नीलाही छळले आणि बाळालाही सोडले नाही.
बाळाला तर त्याने सिगारेटचे चटके दिले. या मुलीवर उपचार करणार्या डॉक्टरांनी तिला दाखल केल्यानंतर तिची तपासणी केली आणि अडीच महिन्याच्या या लेकरावर जन्मल्यापासून हे अत्याचार सुरू होते असे निदान केले. हे खरे असेल तर या बापाला बाप म्हणावे की कसाई असा प्रश्न पडतो. या कसायाची आणखी एक बायको आहे पण तिला मुलगा झाला नाही म्हणून दुसरे लग्न केले होते. दुसर्या बायकोलाही मुलगा झाला नाही हे कळले त्यावर त्याचे डोके फिरले आणि त्याने हे नृशंस कृत्य केले.
आपली जीवन पद्धती, आपल्या मुला-मुलींत भेद करण्याच्या कल्पना, आजच्या काळात वाढत चाललेली मुलींची असुरक्षितता, हुंडा पद्धती आणि एकूणच आपली पुरुषप्रधान मनोवृत्ती यामुळे लोक मुलगी झाली की हिरमुसले होतात. मुलीपेक्षा मुलगा झाला असता तर बरे झाले असते असे त्यांना वाटते. अर्थात आता आता या संबंधात जागृती होत आहे.
मुळात उच्चभ्रू समाजात अपत्येच होत नाहीत. त्यामुळे मुलगा काय की मुलगी काय, काही तरी अपत्य होतेय आणि आपली मातृत्व- पितृत्वाची इच्छापूर्ती होतेय, यातच समाधान मानायलाही काही लोक तयार आहेत. मुलींसाठी वातावरण एकंदरीत प्रतिकूल असले तरीही मुलगी होणे म्हणजे फार मोठा शाप आहे आणि तिला जन्मताच ठार केले पाहिजे, अशी स्थिती नक्कीच नाही. असे असतानाही एक बाप आपल्या पोटी जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला एखाद्या मोठ्या बाईला छळावे तसे छळू शकतो ही गोष्ट मनाला बेचैन करणारी आहे.
गेल्या जानेवारीत दिल्लीत फलक नावाच्या दोन वर्षाच्या मुलीच्या बाबतीत असाच प्रकार घडला. तिची इतकी छळवणूक झाली होती की तिच्या शरीरावर तर व्रण होतेच पण शरीराच्या काही अवयवांच्या आतूनही इजा झालेली होती. फलकची कथा मात्र फारच मनाला अस्वस्थ करणारी होती. तिच्या आईला तिच्या जन्मानंतर वेश्या व्यवसायासाठी विकण्यात आले होते. तिला फलकच्या आधी अजून दोन अपत्ये होती. या प्रकरणात केवळ फलकच नाही तर त्या दोन भावंडांचीही मन विदीर्ण करणारी परवड झाली होती.
त्या प्रकरणात १५ वर्षांच्या एका मुलीने फलकची अवस्था बघून तिची दया येऊन तिला सरकारी दवाखान्यात दाखल केले. आपणच तिची आई आहोत असे तिने बळेच सांगितले. पण नंतर वस्तुस्थिती कळली. नंतर चौघांना अटक करण्यात आली कारण त्यांनी देवाघरची फुले म्हणवल्या जाणार्या मुलांच्या बाबतीत जघन्य अपराध केला होता. बंगलोरमध्ये जल्मलेली ही मुलगी मरण पावली.
असे प्रकार पाहिल्यावर आपल्या समाजाचाही राग येतो. एक बाप आपल्या नवजात मुलीला अशा प्रकारे छळतोय ही गोष्ट लपून कशी राहिली ? आजूबाजूला राहणार्या लोकांना ही गोष्ट कळली कशी नाही? कळली असलीच तर आता आता लोक कळूनही तिच्या बाबतीत उदासीनता बाळगयाला लागले आहेत. तो त्यांच्या घरातला मामला आहे, आपण त्यात पडण्याचे काही कारण नाही अशी लोकांची धारणा झाली आहे.
घरातला मामला म्हणून विवाहितांच्या छळाकडे आणि लहान बालकांवर होणार्या अत्याचाराकडे हा समाज असा पाहाणार असेल आणि यात हस्तक्षेप करून पोलिसांत तक्रार करत नसेल तर हा समाज समाज म्हणून जगण्याच्या पात्रतेचा नाही असे म्हणावे लागेल. समाज समाज म्हणजे तरी या गोष्टी कोण करणार आहे ? आपणच करणार आहोत. समाजात अशी कामे करणार्या संघटना म्हणजे आपणच संघटित होऊन हे काम करणार आहोत.
आता समाजात अशा संघटना कमी झाल्या आहेत. आपण आपले घर आणि आपला टीव्ही याच्या पलीकडे काही पाहायलाच तयार नाही. आत्मकेन्द्रितता वाढत आहे. असा काही प्रकार घडला की काही शिष्ट लोक, या समस्यांवर प्रबोधन हाच एक इलाज आहे असे नेहमीचे वाक्य फेकून आपल्या मनाचे समाधान करून घेतात. प्रबोधन आवश्यक आहे पण ते आधी अशा आत्मकेन्दित लोकांचे झाले पाहिजे.