न्यायाधीशांच्या परीक्षा मराठीतून घ्या न्यायालयाची भाषा मराठीतूनच हवी….

मुंबई, दि. १६ – बॉंम्बे हायकोर्टचे नामकरण मुंबई उच्च न्यायालय असे करण्यास राज्य सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा करावा, न्यायाधीशांची परीक्षा मराठीतच घ्यावी. न्यायालयाचे कामकाज मराठीतच व्हावे आणि १२ वीची विज्ञानाची परीक्षा मराठीतच व्हायला हवी, अशी जोरदार मागणी शिवसेना गटनेते दिवाकर रावते यांनी विधानपरीषदेत केली.
    दिवाणी न्यायाच्या संबंधीत चर्चेत भाग घेताना दिवाकर रावते यांनी मराठी भाषेची राज्यांच्या प्रशासनात सुरू असलेली गळचेपी, अवहेलनाचा पाढा वाचला.
    शिवसेना, भाजपा, युती सत्तेवर असताना तुम्ही काय दिवे लावलेत, असा प्रश्‍न विचारला जातो तेंव्हा मी त्यांना सांगतो की, युती सरकारने महाराष्ट्राच्या प्रशासनाची राज्य सरकारची भाषा मराठी असावी म्हणून प्रयत्न केले. कामकाज मराठीतून व्हावे, असे आदेश दिले. करूणानिधी हे तामीळनाडूचे मुख्यमंत्री असताना केंद्रीय कायदामंत्री हंसराज भारव्दाज यांना जाऊन भेटले. तामीळनाडू उच्च न्यायालयाची भाषा तामीळीच असावी, हा घटनात्मक अधिकार आहे असे सांगितले. महाराष्ट्रात मराठी भाषेत कामकाज असावे हा आमचा राज्यघटनेचे दिलेला अधिकार आहे, असे सांगून न्यायालयाची भाषा मराठीतच असावी न्यायाधीशांची परीक्षा मराठीतूनच घ्यावी, अशी भूमिका रावते यांनी मांडली.

Leave a Comment